पुढील महिन्यात दर शनिवार-रविवारी मतदार नोंदणीसाठी खास मोहीम

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

मतदार यादी संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून

पुणे : आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेकडून छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर रोजी शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात दर शनिवार-रविवार खास मतदार नोंदणी मोहीम आयोजित करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदार यादीवरील दावे, हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. २० डिसेंबरपर्यंत प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत, तर ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान नवीन मतदार नोंदणी, दुबार नावे वगळणे, नाव, पत्ता यासह इतर तपशिलात दुरुस्ती, मतदार नोंदीचे स्थानांतरण आदी अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिली.

दरम्यान, नवीन मतदार नोंदणी किंवा एका मतदार संघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थानांतर झाले असल्यास मतदार नोंदणीसाठी नमुना सहा, परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकास मतदार नोंदणीसाठी नमुना सहा-अ, इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यास आक्षेप घेणे, स्वत:चे किंवा इतर व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी नमुना सात, तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना आठ, मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी (एकाच मतदारसंघात निवासाचे ठिकाण बदलले असल्यास) नमुना आठ-अ अर्ज भरून देणे आवश्यक आहे. खास मोहिमेदरम्यान हे नमुने भरून आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बूथ लेव्हल ऑफिसर – बीएलओ) द्यावेत. तसेच या सर्व सुविधा ऑनलाइनरीत्या  https://www.nvsp.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत, असेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी सावंत यांनी स्पष्ट केले.

खास मोहीम कधी

शनिवार १३ नोव्हेंबर, रविवार १४ नोव्हेंबर, शनिवार २७ नोव्हेंबर आणि रविवार २८ नोव्हेंबर या दिवशी मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारणे आदींसाठी मतदान केंद्रांवर खास मोहीम राबवण्यात येणार आहे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Special campaign for voter registration every saturday sunday next month akp