पुणे : लोकसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडन येथे केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा उल्लेख केला होता. त्या पुस्तकाची प्रत राहुल गांधी यांच्या वकिलांनी आम्हाला द्यावी, अशी मागणी करणारा सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला.
विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी हा अर्ज फेटाळला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरण राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या दाव्यात हा अर्ज करण्यात आला होता. दि. ५ मार्च २०२३ रोजी लंडनमध्ये एका व्याख्यानात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिलेल्या मजकुराचा संदर्भ दिला होता. परंतु, असा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोणत्याही पुस्तकात नाही. म्हणून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली, असा बदनामीचा फौजदारी खटला सात्यकी सावरकर यांनी दाखल केला आहे.
गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांच्या मागणीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘माझी जन्मठेप’ आणि ‘हिंदुत्व’ ही पुस्तके त्यांना हस्तांतरित केली आहेत. आता राहुल गांधी यांनी लंडन येथील त्यांच्या भाषणात उल्लेख केलेल्या ‘त्या’ पुस्तकाची प्रत आम्हाला द्यावी, असा अर्ज सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. हा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला.
मागणी नैसर्गिक न्यायतत्त्वाला धरून नाही
फौजदारी खटल्यामध्ये ज्याने खटला दाखल केला आहे, त्यानेच तो सिद्ध करायचा असतो. खटल्याची नियमित सुनावणी सुरू होण्याअगोदर फिर्यादी पक्षाला बचाव पक्षाकडे कागदपत्रे मागण्याचा अधिकार नसतो. फिर्यादी यांचा अर्ज नैसर्गिक न्यायतत्त्वाला धरून नाही. त्यामुळे फिर्यादी यांची मागणी चुकीची असून कायद्याला धरून नाही, असा युक्तिवाद ॲड. पवार यांनी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.