पुणे : कोथरूड भागात संगणक अभियंता तरुणाला मारहाण प्रकरणात ‘मकोका’अंतर्गत कारवाई केल्यानंतर या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी गुंड गजा मारणे याने न्यायालयात जामीन अर्ज सादर केला. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी मारणेचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात मारणेसह दहा साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास न्यायालयाने गुन्हे शाखेला तीस दिवसांची मुदतवाढ दिली.
कोथरूड भागात संगणक अभियंत्याला मारहाण प्रकरणी गजा मारणे याच्यासह साथीदार रुपेश मारणे, भाचा श्रीकांत ऊर्फ बाब्या पवार यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचा आदेश दिला. याप्रकरणी मारणेसह साथीदारांना अटक करण्यात आली. श्रीकांत पवार, रुपेश मारणे फरार आहेत. मारणे याने त्याचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज सादर केला होता.
‘मारहाण प्रकरणात ‘मकोका’चे कलम लागू होत नाही. आपल्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना कोणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र फिर्यादी संगणक अभियंता तरुणाने न्यायालयात सादर केल्याचे बचाव पक्षाचे वकील ॲड. ठोंबरे यांनी न्यायालयात युक्तिवादात सांगितले. मारणे याच्याकडून फिर्यादीवर दबाब आणला जात आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून, फरार आरोपींना अटक करायची आहे, असे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.