पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम – एचटीएमएस) अंतर्गत कामे सुरू झाली आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानुसार या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच संपूर्ण मार्गावर ९३ ठिकाणी ३७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. परिणामी अति वेगाने वाहन चालविणे, मार्गिका तोडणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणे सोपे होणार आहे.
द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने एचटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार दर चार कि. मी. अंतरावर वेग तपासणारी यंत्रणा, मार्गिका तोडली जात आहे किंवा कसे, याबाबतची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवणारी विशेष प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. याशिवाय पुणे-मुंबई दरम्यान अनेक वळणे, घाट, धबधबे आणि इतर निसर्गरम्य ठिकाणे असल्याने प्रवासी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवितात. तसेच उपाहारगृह किंवा इतर ठिकाणी वाहने थांबविल्याने वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीच्या मार्गावर अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने आयआरबी कंपनीकडून महामार्गालगत ठरावीक अंतरांवर वाहन थांबे करण्याचा प्रस्ताव आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ठराविक अंतरानंतर वाहनांसाठी थांबे उभारणे गरजेचे असून याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाकडून मान्यता मिळताच ही कामेही करण्यात येणार आहेत.
याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर म्हणाले, ‘पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेबाबत राज्य सरकारच्या आदेशानुसार एचटीएमएस प्रणाली अंतर्गत कामांना सुरुवात करण्यात आली आहे. ठरावीक अंतरावर सीसीटीव्ही आणि वेग नियंत्रणावर लक्ष ठेवणारे यंत्र लावण्यात येत आहेत. ही कामे ४० टक्के पूर्ण झाली आहेत. सप्टेंबर अखेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सद्य:स्थितीला वाहतूक पोलीस आणि महामार्ग अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. महामार्गालगत असणारी निसर्गरम्य ठिकाणे, घाट रस्त्यात वाहने थांबविली जातात, अशा वाहनधारकांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. पायाभूत प्रकल्पांतर्गत आयआरबी कंपनीकडून वाहन थांब्यांबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून मान्यता बाकी आहे. मान्यता मिळताच पुढील कामे सुरू करण्यात येतील.’