भारतीय क्रिकेट संघातील माजी गोलंदाज सदानंद मोहोळ यांच्या अमृतमहोत्सवाच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने माजी कर्णधार सुनील गावसकर व चंदू बोर्ड यांनी केलेल्या क्रिकेटविषयीच्या गप्पांच्या फटकेबाजीत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही नेहमीच्या शैलीत विविध किस्स्यांचे चौकार अन् षटकार लगावले.. मोहोळ यांच्या विषयीच्या विविध आठवणींना या सर्वानीच उजाळा दिला..!
सदानंद मोहोळ हे कार्याध्यक्ष असलेल्या मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकेकाळी मोहोळ यांच्या बरोबर क्रिकेट खेळलेले गावसकर, बोर्डे व मोहोळ यांच्या गोलंदाजीचे स. प. महाविद्यालयापासून साक्षीदार असलेले श्रीनिवास पाटील यांनी आवर्जून कार्यक्रमाला हजेरी लावली. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार अशोक मोहोळ, नानासाहेब नवले, माजी मंत्री मदन बाफना, हर्षवर्धन देशमुख, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ तसेच भाऊसाहेब मोहोळ आदी त्या वेळी उपस्थित होते.
श्रीनिवास पाटील यांनी मोहोळ यांच्या आजवरच्या कार्याचे कौतुक केले. स. प. महाविद्यालयातील त्यांच्या शैक्षणिक कालावधीतील विविध किस्से यांनी सांगितले. वर्तमानपत्रावर भेळ करायची, ती खायची, त्यावर पाणी प्यायचे अन् कटिंग चहा प्यायला जायचे, ही आठवणही त्यांनी सांगितली. क्रिकेटची अर्धी टीम आमच्या वर्गात होती, पण आम्ही केवळ कपडे सांभाळायला होतो, असा किस्सा सांगताच उपस्थितांनी त्याला हास्य व टाळ्यांनी दाद दिली.
गावसकर म्हणाले की, वेगवान गोलंदाजाला खेळणे सोपे व मोहोळ यांच्यासारख्या फिरकी गोलंदाजाला खेळणे कठीण असते. चेंडू नेमका कुठे वळणार हे कळत नाही. त्यामुळे सतत पुढे मागे हलावे लागत असल्याने ‘ज्ञानबा-तुकाराम’ म्हटल्यासारखी अवस्था होते. मोहोळ यांचा सहभाग असलेल्या मुंबई व महाराष्ट्राच्या संघादरम्यान पुण्यात नेहरू स्टेडियमवर झालेल्या सामन्याची आठवणही गावसकर यांनी सांगितली.
बोर्डे म्हणाले की, मोहोळ यांना मी ‘स्वींग किंग’ संबोधतो. महाराष्ट्राच्या संघासाठी त्यांनी दहा वर्षे उत्तम गोलंदाजी केली. फारशा सुविधा नसल्याच्या काळात त्यांनी चांगली कामगिरी केली. सुनील व सचिनप्रमाणेच पाय नेहमी जमिनीवर ठेवले.
सदानंद मोहोळ म्हणाले की, मी क्रिकेटर होण्यासाठी खेळलो नाही. नियतीने मला क्रिकेटमध्ये आणले. खूप खेळलो नसलो, तरी त्यात मनापासून आनंद घेतला.
सचिन तेंडुलकरवर विशेष फिल्म
क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यावर क्रिकेट बोर्डाकडून विशेष फिल्म तयार करण्यात येत आहे. कार्यक्रमाला उशिरा पोहोचलेल्या सुनील गावसकर यांनी उशीर होण्याचे कारण देताना, या फिल्मचा उल्लेख केला. या फिल्मसाठी माझी व शेन वॉर्न यांची मुलाखत असल्याने उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले.