पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनांवर निर्बंध आणणारे पत्रक रद्द न केल्याने विद्यार्थी संघटनांनी थेट कुरुगुरूंच्या गाडीवर चढून, गाडी समोर उड्या मारून राडा घातल्याची घटना बुधवारी घडली.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक संपल्यानंतर विद्यापीठात आंदोलन करण्यासंदर्भातील परिपत्रकावर सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातील काही विद्यार्थ्यांनी थेट कुरुगुरूंच्या गाडीवर चढून आणि गाडी समोर उड्या मारून राडा घातला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठाशी संबंधित आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन करावे, असा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये करण्यात आला. त्यावर विविध विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेत आंदोलन केले. याबाबत व्यवस्थापन परिषदेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आंदोलक विद्यार्थ्यांना प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. या आश्वासनानंतर संघटनांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, बुधवारी व्यवस्थापन परिषदेत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आंदोलनांवर निर्बंध आणणारे पत्रक रद्द करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीबाहेर कुलगुरूंच्या गाडीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. कुलगुरूंच्या गाडीवर उड्या मारून संताप व्यक्त केला. अखेरीस विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून पायी चालत कुलगुरू निवासस्थानी गेले. त्यानंतरही विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू ठेवले.
विद्यार्थी संघटनांनी आंदोलनावरील निर्बंधासंदर्भातील परिपत्रक मागे घेतले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा दिला आहे.
विद्यापीठाच्या परिपत्रकाचा उद्देश काय?
‘विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा आणण्याचा मुळीच नाही. त्यामुळे या परिपत्रकाची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. विद्यापीठाच्या आवाराची मुख्यतः सर्व प्रवेशद्वारावरील सुरक्षा व्यवस्था राबवित असताना विद्यार्थ्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी,’ असा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाची टाळाटाळ, आश्वासनांची अपूर्तता, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध आणि पोलिसी दडपशाही व विद्यार्थ्यांना झालेली मारहाण; यामुळे विद्यापीठ प्रशासनावरील आमचा विश्वास उरलेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या हक्क, अधिकार आणि लोकशाही अभिव्यक्तीसाठी संविधानिक मार्गाने आमचा संघर्ष अविरत सुरूच राहील. – अभिषेक शेलकर, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यापीठ प्रशासनाने काढलेले आंदोलनविरोधी परिपत्रक हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि आंदोलनाचा अधिकार संपवून हुकूमशाही व दडपशाही लादण्याचा प्रयत्न आहे. कुलसचिवांनी मॅनेजमेंट व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थ्यांची बाजू मांडण्याचा शब्द देऊनही पाळला नाही. याउलट कुलगुरू आणि कुलसचिवांनी पोलिसांकरवी विद्यार्थ्यांना मारहाण करवून घेतल्याचा गंभीर प्रकार घडला. मात्र, हे आंदोलनविरोधी परिपत्रक तात्काळ रद्द झालेच पाहिजे. अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. – ॲड. अभिजित गोरे-देशमुख, अध्यक्ष, पुणे एनएसयूआय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांची गळचेपी करणारे हुकूमशाही परिपत्रक रद्द न करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत निषेधार्ह आहे. प्रशासनाची ही भूमिका विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट हल्ला आहे. या अन्यायकारक निर्णयामुळे समस्त विद्यार्थी वर्गात तीव्र संताप आणि नाराजी पसरली आहे. या हुकूमशाही कारभाराविरोधात अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन छेडणार आहोत. – हंसराज खुणे, पुणे शहराध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागणे हा काय गुन्हा आहे? विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी पोलिसांचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर हे अत्यंत गंभीर आहे. कुलगुरूंनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून संबंधितांवर कारवाई करावी आणि विद्यापीठाने वादग्रस्त परिपत्रक तात्काळ रद्द करावे. विद्यार्थी अशा दडपशाहीसमोर झुकणार नाहीत. – किरण सैंदाणे, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये २०२४ आणि २०२६ ला काढलेले परिपत्रक पूर्णपणे विद्यापीठ परिसरातील लोकशाही अवकाश संपवणारे आहे. या दोन्ही परिपत्रकांविरोधात सर्व डाव्या, पुरोगामी, आंबेडकरी विद्यार्थी संघटना विद्यापीठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बुधवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलाविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र, बैठकीत चर्चा झाली नाही. याउलट कुलगुरूंना व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती लेखी मागितली असता, पोलिसांना बोलवून विद्यार्थ्यांन अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मात्र, ही दोन्ही पत्रके रद्द होईपर्यंत लढा देत राहू. – अदित्य कासारे, उपाध्यक्ष, एसएफआय, पुणे शहर समिती
