पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध घटकांकडून वाढत्या राजकीय हस्तक्षेपाबाबत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ‘अतिरिक्त कार्यभार निभावणारे प्राध्यापक, कर्मचारी, अधिकाऱ्यांना अधिकार, निर्भय, सुरक्षित वातावरण, सन्मानाची वागणूक हवी आहे, बाह्य प्रवृत्तींना थारा देण्यात येऊ नये, विद्यापीठाला बदनामीपासून वाचवले पाहिजे,’ अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. ‘कुलगुरू, प्रशासनाने आंदोलनांच्या दबावाखाली निर्णय घेऊ नये, आम्ही कुलगुरू, प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,’ असा विश्वासही शिक्षक, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दिला.
सावित्रीबाई फुले शिक्षक संघटनेने कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला होता. दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केल्याबाबत घडलेली घटना, त्यानंतर विद्यार्थिनींनी केलेले आंदोलन, त्या प्रकरणी वसतिगृह प्रमुख, सहायक प्रमुखांनी दिलेले राजीनामे ही पार्श्वभूमी या निवेदनामागे होती. या अनुषंगाने बुधवारी सायंकाळी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन शैक्षणिक विभागांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासमोर त्यांच्या भावना मांडल्या. प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार या वेळी उपस्थित होते.
‘विद्यापीठातील शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीची भावना, मानसिक तणाव आहे. शिक्षक, कर्मचारी, अधिकारी अतिरिक्त जबाबदारी किंवा काहीही काम करायला तयार आहेत. पण, निर्भय वातावरण हवे आहे. कोणत्याही बाबतीत सत्यासत्यता पडताळली गेली पाहिजे, त्यासाठी एक कार्यपद्धती निश्चित करावी. थेट राजीनामे घेण्यासारखी कारवाई केली जाऊ नये,’ अशी भावना प्रामुख्याने व्यक्त करण्यात आली.
‘अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या शिक्षकांना बळीचा बकरा ठरवले गेले आहे. त्यातून शिक्षकांच्या अस्मितेला धक्का लागत आहे, चुकीची वागणूक दिली जात आहे. राजकीय पक्ष, संघटना यांच्या दबावाचे पडसाद शिक्षक, प्रशासनावर उमटत आहेत. विद्यापीठात नावाजलेले शिक्षक आहेत. विभागप्रमुखांची स्वायत्तता टिकली पाहिजे,’ असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. सतीश परदेशी यांनी सांगितले.
‘विद्यापीठात होणारी आंदोलने ‘फॅब्रिकेटेड’ होती. विद्यापीठाची बदनामी करणाऱ्यावर आसूड ओढले पाहिजे. उपद्रवी लोकांमुळे क्रमवारीत विद्यापीठाचे स्थान खाली जात आहे,’ अशी भावना डॉ. संदेश जाडकर यांनी व्यक्त केली. ‘गेल्या काही वर्षांत बाह्य प्रवृत्तींची हिंमत वाढत गेली. काही प्रकरणात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अपमानास्पद पद्धतीने राजीनामे घेण्यात आले. हे प्रकार थांबवले पाहिजेत,’ असे संतोष मदने यांनी सांगितले.
‘काही प्रवृत्ती विद्यापीठाबाबतचा दृष्टिकोन बदलत आहेत. या प्रवृत्तींना थारा दिला जाऊ नये. विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १२३५ पदे होती. आता तीन आकडी कर्मचारीच राहिले आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चाही होत नाही. प्रशासनाकडून आम्हाला पाठिंब्याची गरज आहे,’ असे ज्ञानेश्वर साळुंके यांनी नमूद केले. अधिसभा सदस्य डॉ. करिश्मा परदेशी यांनी कुलगुरू, प्रशासन आणि शिक्षक, कर्मचारी, अधिकारी यांच्यात सातत्याने मुक्त संवादाची गरज व्यक्त केली.
विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या हक्कांचा समतोल राखला जाईल. कायद्यानुसार विहित प्रक्रियेने निर्णय होतील. कोणत्याही संघटनेच्या, जमावाच्या, गटाच्या दबावाखाली कोणताही राजीनामा, निलंबन होणार नाही. संपूर्ण चौकशीअंतीच कायदेशीर निर्णय घेण्यात येईल. विद्यापीठ आवाराचा वापर विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या आंदोलन, कार्यक्रमांसाठी करता येणार नाही. अतिरिक्त जबाबदारीबरोबर आवश्यक अधिकार दिले जातील. वसतिगृह प्रमुखांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत:हून पदमुक्त करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांना हटवण्यात आल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या चुकीच्या वृत्तांकनाचे खंडन करण्यात येईल. सर्व शिक्षक, सेवक, विद्यार्थ्यांचा सन्मान, मुलभूत अधिकारांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू
