पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे विद्यापीठ स्तरावर कला आणि क्रीडाच्या विविध स्पर्धाचा समावेश असलेला ‘बहर’ हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. त्यात नोव्हेंबरमध्ये क्रीडा स्पर्धा आणि डिसेंबरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये तंत्रशिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण संचालनालयाचे सहायक संचालक (लेखा), उच्च शिक्षण सहसंचालक आणि अंकित प्रभू हे अशासकीय सदस्य यांचा समावेश आहे.
या समितीच्या अंतर्गत विभागीय समित्यांची नियुक्ती करून महाविद्यालयातील कार्यक्रम, खेळांची निवड करण्यात येईल. तर मुख्य समितीकडून महोत्सवाची रूपरेषा, कार्यक्रमनिहाय दिनदर्शिका ठरवली जाईल. विद्यापीठ स्तरावरील महोत्सवासह पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने युवा महोत्सव आयोजित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
आयोजन का?
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या औचित्याने राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कला आणि क्रीडा गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.