पुणे : पुण्यातील ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ या खासगी स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची मुख्य प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. डिसेंबर २०२४ मध्ये संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी बी. थिलागावती यांची अध्यक्षपदी झालेली निवड कायदेशीरदृष्ट्या वादात सापडली होती. श्री बालाजी विद्यापीठ या विद्यापीठाच्या विश्वस्त संस्थेतील (ट्रस्ट) अंतर्गत वादामुळे दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला होता. या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.
न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप केला. विद्यापीठाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा आदेश दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले.
प्रशासक मंडळामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, ‘सीओईपी’चे अधिष्ठाता पराग सदगीर यांचाही प्रशासक मंडळात समावेश आहे. प्रशासक मंडळाने तत्काळ विद्यापीठाची सूत्रे हाती घेतली. विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांशी आंदोलनस्थळी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. प्रशासक मंडळाच्या माध्यमातून येत्या काळात विद्यापीठाचे दैनंदिन शैक्षणिक, प्रशासकीय कामकाज पूर्णपणे सुरळीत होईल, असे नमूद करण्यात आले.
