जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळावर सातपैकी बाहेरील पाच विश्वस्त नेमल्याने सुरू असलेले आंदोलन स्थानिक चार विश्वस्तांची नेमणूक करण्याच्या निर्णयानंतर मागे घेण्यात आले. त्यामुळे जेजुरीमधील तणाव निवळला असून स्थानिक चार विश्वस्तांची नेमणूक करण्यात येणार असल्याने विश्वस्तांची संख्या ११ होणार आहे. या निर्णयानंतर ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळावर सातपैकी बाहेरील पाच विश्वस्त नेमल्याने गेल्या १३ दिवसांपासून ग्रामस्थांकडून आंदोलन सुरू होते. आंदोलनामध्ये सर्व जेजुरीकर सहभागी झाल्याने त्याची व्याप्ती वाढत चालली होती. खांदेकरी -मानकरी ग्रामस्थ मंडळातर्फे सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्याकडे जेजुरीच्या रुढी, परंपरा,सण -उत्सवाची माहिती असलेले स्थानिक विश्वस्त नेमावेत यासाठी विनंती अर्ज करण्यात आला होता.

हेही वाचा >>> जेजुरी : खंडोबा गडावर चार स्थानिक विश्वस्तांची नेमणूक होणार, ग्रामस्थांचं आंदोलन मागे

सध्याचे विश्वस्त ७ असून यामध्ये स्थानिक चार विश्वस्तांची अधिक नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी सहधर्मादाय आयुक्त यांनी मान्य केली आणि तसा ठराव करून देण्याचे आदेश नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाला दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याची त्यांनी सूचना केली. या निर्णयानंतर ग्रामस्थांनी फटाके वाजवून भंडारा उधळीत आनंद साजरा केला. आंदोलन मागे घेण्यात आल्याने जेजुरीतील तणाव निवळला आहे. श्री खंडोबा देवाचा कारभार पाहणाऱ्या श्री मार्तंड देव संस्थान समितीच्या सर्व विश्वस्तांनी आज जेजुरीत येऊन आंदोलकांशी चर्चा केली.

हेही वाचा >>> भाजप मावळ, शिरूरवर दावा करणार का? बाळा भेगडे म्हणाले, “जर भाजप आणि…”

जेजुरीकर ग्रामस्थांच्या भावना आम्हाला समजल्या असून, सर्वजण स्थानिक चार विश्वस्त नेमण्यासाठी सहकार्य करू, आवश्यक ती सर्व न्याय प्रक्रिया पार पाडू असे मुख्य विश्वस्त पोपट खोमणे यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, अभिजित देवकाते, ॲड. विश्वास पानसे, अनिल सैंदाडे उपस्थित होते. विश्वस्त मंडळ बैठकीमध्ये जेजुरीतील स्थानिक चार विश्वस्त घेण्याचा ठराव करण्यात येणार असून सोमवारी याबाबत सहधर्मादाय आयुक्त पुढील आदेश देणार आहेत. माजी विश्वस्त संदीप जगताप, अजिंक्य देशमुख, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सुधीर गोडसे, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, जयदीप बारभाई, सचिन पेशवे, अलका शिंदे, विठ्ठल सोनवणे, किरण डावलकर, उमेश जगताप यावेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri jejuri temple board of trustees dispute settled pune print news apk 13 ysh
First published on: 08-06-2023 at 12:49 IST