पुणे : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे प्रश्नपत्रिकांचे दोन संच चोरीला गेल्याप्रकरणी चोरी केलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, एक पोलिस, दोन गृहरक्षक (होमगार्ड) यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी दिली.

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील भूगोल विषयाची परीक्षा मंगळवारी (१८ मार्च) होणार होती. त्याच्या आदल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर येथील प्रश्नपत्रिका ठेवलेल्या खोलीचे कुलूप तोडून प्रश्नपत्रिकांचे दोन संच (५० प्रश्नपत्रिका) चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांनी तपासणी केली.

शाळेत प्रश्नपत्रिका ठेवलेल्या ठिकाणचा सीसीटीव्ही बंद असल्याचे यात निदर्शनास आले. याबाबत उकिरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. होऊ घातलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाच चोरीला गेल्यामुळे परीक्षा पुढे ढकलला जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, राज्य मंडळाने ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार मंगळवारी परीक्षा घेण्यात आली.

उकिरडे म्हणाले, ‘प्रश्नपत्रिकांचे संच चोरलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो विद्यार्थी अन्य स्वयंअर्थसहाय्यित शाळेचा विद्यार्थी आहे. प्रश्नपत्रिका चोरीला जाण्याच्या घटनेपूर्वीही चोरीचा एक प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले होते. तसेच, तेथील ‘सीसीटीव्ही’सुद्धा बंद होता. या प्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त होता. मात्र, चोरीची घटना घडली, त्या वेळी दिवे गेले होते. बंदोबस्तावर असलेले एक पोलीस कर्मचारी, दोन गृहरक्षक त्या जागेवरून दुसरीकडे गेले होते. त्यामुळे त्या तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे.’

‘पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल,’ असे त्यांनी नमूद केले.