पुणे : दहावीच्या परीक्षेत गणित भाग – १, तसेच गणित भाग – २ या विषयांच्या प्रश्नपत्रिका समाज माध्यमात प्रसारित केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चंद्रपूरमधील एका तरुणाला अटक केली. दहावीची प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा दावा करणाऱ्या तरुणाने पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले.

दहावीच्या परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित प्रकार पेपरफुटीचा नसून, परीक्षार्थ्यांची दिशाभूल करून पैसे उकळण्याचा डाव असल्याचे उघडकीस आणले. ‘या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास करून एका १८ वर्षीय तरुणाला अटक केली. तो मूळचा चंद्रपूरमधील आहे,’ अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी दिली.

दहावीच्या परीक्षेतील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका समाज माध्यमात प्रसारित झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. तपासात पोलिसांना प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात पैसे मिळविण्यासाठी आरोपीने वापरलेला एक ‘क्यूआर कोड’ मिळाला. हा कोड पोलिसांनी ‘स्कॅन’ केला, तेव्हा आरोपीचे नाव समजले. त्यानंतर पोलिसांनी ऑनलाइन व्यवहार करणारी कंपनी, तसेच समाज माध्यम कंपनीकडून तांत्रिक माहिती मिळवली. तरुण मूळचा चंद्रपूरमधील असल्याची माहिती पोलीस कर्मचारी तेजस चोपडे, गणेश जाधवर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक चंद्रपूरला रवाना झाले. तेथून तरुणाला अटक करण्यात आली.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, तेजस चोपडे, गणेश जाधवर, गणपत वालकोळी, अर्जुन कडाळकर यांनी ही कारवाई केली.

फसवणूक कशी केली ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने समाज माध्यमात एक समुह तयार केला. या समुहावर पीडीएफ फाइल प्रसारित केली. ही फाइल म्हणजे मूळ प्रश्नपत्रिका असल्याची त्याने बतावणी केली. प्रत्यक्षात गणित विषयाची परीक्षा पार पडल्यानंतर संबंधित फाइलमध्ये त्याने मूळ प्रश्नपत्रिका अपलोड केली. फाइलमध्ये फेरफार केले, तरी समाज माध्यमातील अपलोड करण्याची वेळ जुनीच (परीक्षेच्या आदल्या दिवशीची) राहत असल्याने प्रश्नपत्रिका आधीच प्रसारित करण्यात आल्याचा भास व्हायचा. संबंधित फाइल उघडण्यासाठी सांकेतिक शब्द देतो, असे सांगून हा तरुण ६०० रुपये मागत असल्याचे उघड झाले. पैसे मिळताच आरोपी तरुण विद्यार्थ्याचा मोबाइल क्रमांक ‘ब्लाॅक’ करायचा.

या प्रकरणात चंद्रपूरमधील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. तांत्रिक फेरफार करून त्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. – कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक