पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कॉपी प्रकरणांच्या संख्येत घट झाली. पण, त्याचबरोबर परीक्षेतील गैरप्रकारांप्रकरणी विक्रमी १०३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. राज्यात केवळ कोकण विभागात एकाही गैरप्रकाराची नोंद झाली नाही.
राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ८६२, दहावीसाठी १६ लाख १४ हजार ९८७ नोंदणी केली होती. दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त मोहीम राबवण्यात आली. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, बैठी पथके, भरारी पथके, ड्रोन, पोलीस बंदोबस्त अशा उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतरही काही केंद्रांवर कॉपीची प्रकरणे उघडकीस आली. सांगोला येथे प्रश्नपत्रिकांचे दोन गठ्ठेच चोरीला गेल्याची घटना घडली.
राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये दहावीच्या परीक्षेत ९३, तर बारावीच्या परीक्षेत ३६४ गैरप्रकारांची नोंद झाली होती. यंदा झालेल्या परीक्षांदरम्यान दहावीच्या परीक्षेत ७४, तर बारावीच्या परीक्षेत २३७ गैरप्रकारांची नोंद झाली.
‘दर वर्षी गैरप्रकारांची नोंद होते. मात्र, यंदा राज्य मंडळाने कठोर भूमिका घेऊन थेट कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली. अमरावती विभागात ५०, छत्रपती संभाजीनगर विभागात ३३, लातूर विभागात ५, नागपूर विभागात ४ अशा एकूण १०३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. इतक्या प्रमाणात कर्मचारी निलंबित करण्याची यंदा पहिलीच वेळ आहे,’ अशी माहिती राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
अमरावती, पुण्यात सर्वाधिक गैरप्रकार
एकूण आकडेवारीचा आढावा घेतला असता, बारावीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेत गैरप्रकारांचे प्रमाण कमी राहिले. त्यातही बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात सर्वाधिक ५९, तर दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात सर्वाधिक २५ गैरप्रकार नोंदवले गेले.
बारावीच्या परीक्षेतील विभागीय मंडळनिहाय गैरप्रकार
पुणे : ४७
नागपूर : २७
छत्रपती संभाजीनगर : ४६
मुंबई : १६
कोल्हापूर : १
अमरावती : ५९
नाशिक : ५
लातूर : ३६
कोकण : ०
एकूण : २३७
दहावीच्या परीक्षेतील विभागीय मंडळनिहाय गैरप्रकार
पुणे : २५
नागपूर : १४
छत्रपती संभाजीनगर : १७
मुंबई : ३
कोल्हापूर : ०
अमरावती : ४
नाशिक : २
लातूर : ९
कोकण : ०
एकूण : ७४
