पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी, बारावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. आता शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज नियमित शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत. तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. राज्य मंडळाने या पूर्वी परीक्षा अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सुरुवातीला २६५ तालुक्यांत, त्यानंतर ४० तालुक्यात अशा एकूण ३०५ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. संबंधित तालुक्यातील विद्यार्थ्यांची दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफत करण्याबाबत राज्य मंडळाने २४ ऑक्टोबर रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले. मात्र, शुल्कमाफी अंमलबजावणी, माहिती ऑनलाइन भरण्याबाबत आवश्यक कागदपत्रे या बाबतच्या मार्गदर्शक सूचना ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, अर्ज भरण्याची मुदत संपत असल्याने शाळा स्तरावर संभ्रमाची स्थिती होती. त्यामुळे मुख्याध्यापक महामंडळाकडून अर्ज भरण्यास मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह भरता येणार आहेत. शाळा, महाविद्यालयांनी शुल्क पावती, विद्यार्थ्यांची प्रि-लिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच दुष्काळ जाहीर केलेल्या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क सवलतीची नोंद करण्यासाठी परीक्षा अर्ज भरण्याच्या ऑनलाइन प्रणालीवर एक नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सवलतीची नोंद करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
