पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणपत्रकाबाबत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्रपणे न देता एकत्रित प्रमाणपत्र देण्यात येणार असून, गुणपत्रकावरील विद्यार्थ्याचे पूर्ण नाव सलग ( विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव) या स्वरूपात नमूद केले जाणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या संदर्भात सर्व विभागीय मंडळांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाच्या कार्यकारी मंडळाची सभा १२ फेब्रुवारी रोजी झाली. या बैठकीत झालेल्या ठरावानुसार फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेपासून दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्रपणे न देता ती एकत्रित देण्यात येणार आहेत. एकत्रित गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव या क्रमाने छपाई करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६च्या प्रवेशपत्रांवरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास त्यावर योग्य छायाचित्र चिकटवून संबंधित मुख्याध्यापक-प्राचार्य यांनी स्वाक्षरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार छायाचित्र दुरुस्त केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्रावर अचूकपणे छापण्यासाठी पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर ‘फोटो करेक्शन’ दुवा कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याद्वारे छायाचित्र दुरुस्तीची कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या नावाच्या बदललेल्या क्रमाबाबत सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना माहिती द्यावी. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या नावात (विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव) त्रुटी उद्भवणार असल्यास त्याबाबतची दुरुस्ती विभागीय मंडळामार्फत तातडीने करून घेण्याबाबत सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक-प्राचार्य, विद्यार्थी, तसेच सर्व संबंधित घटकांना लिखित स्वरूपात कळवण्याबाबतची कार्यवाही करावी. त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचना देण्यात आली आहे.

शाळेतील जनरल रजिस्टर, स्टुडंट पोर्टलपासून सर्वच कागदपत्रांवर विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव अशा स्वरूपात पूर्ण नाव लिहिले जाते. मात्र, राज्य मंडळाच्या प्रमाणपत्रावर आडनाव, विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव अशा स्वरूपात लिहिले जाते. त्यामुळे काही वेळा तांत्रिक अडचणीही उद्भवतात. त्यामुळे मंडळाच्या प्रमाणपत्रावर नाव लिहिण्याची पद्धत बदलण्याची मागणी केली होती. आता मंडळाने त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित देण्याचा निर्णयही उपयुक्त आहे. विद्यार्थ्याचे पहिले ते दहावीचे शिक्षण पूर्ण झाले, यासाठी प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, काही वेळा प्रमाणपत्र मिळण्यास बराच वेळ लागतो. अनेकदा विद्यार्थी प्रमाणपत्र नेतही नाहीत. आता एकत्रित प्रमाणपत्र देण्यामुळे स्वतंत्र छपाई, कागदावरील खर्च कमी होईल. तसेच ते विद्यार्थ्यांसाठीही सुटसुटीत होईल. -महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक