पुणे : इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विचारले जाणारे प्रश्न दहावीच्या मराठी भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करण्यात आल्याची टीका शिक्षक, मराठी अभ्यासकांकडून होत आहे. मात्र, प्रश्नपत्रिका आराखड्यानुसारच तयार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य मंडळाकडून देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रश्नपत्रिकेच्या काठिण्यपातळीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत भाषिक घटकांवर आधारित कृती या अंतर्गत शब्दसंपत्ती या विभागात काही उपप्रश्नांचा समावेश होता. त्यात घर, नदी या शब्दांना समानार्थी शब्द, रात्र, हजर या शब्दांना विरुद्धार्थी शब्द, पुस्तक, झाडे या शब्दांचे वचन बदल, अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, असे प्रश्न विचारण्यात आले. दहावीच्या स्तरावर इतक्या मूलभूत स्तरावरील प्रश्न समाविष्ट करण्यात आल्याने या प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळी घसरल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला.

‘दहावीच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेत व्याकरणामध्ये वृत्त, अलंकार अशा स्वरूपाचे प्रश्न अपेक्षित आहेत. मात्र, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचन-अनेकवचन असे चौथीपर्यंतच्या स्तरावरील विद्यार्थ्यांना विचारले जाणारे प्रश्न दहावीच्या प्रश्नपत्रिकेत होते. दहावीच्या परीक्षेची, त्यातूनही मातृभाषा मराठीच्या प्रश्नपत्रिकेची काहीएक काठिण्यपातळी असली पाहिजे,’ असे मत माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केले.

‘इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचा विचार करता काठिण्यपातळी किती असावी, याबाबत विचार करायला हवा. या वर्षी दहावीच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील व्याकरणसंदर्भातील प्रश्न सोपे आहेत. त्यात सुधारणा होऊ शकते,’ असे मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य सुशील शेजुळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘भाषा विकास होऊन ही पिढी पुढे जायला हवी. त्यात तडजोड नको. राज्य मंडळासह इतर शिक्षण मंडळातही मराठी भाषा विषयाच्या मूल्यमापनाची स्थिती, दर्जा काय आहे, हे पाहिले पाहिजे.’

दहावीच्या मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. आराखड्यानुसारच प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आहे. – नंदकुमार बेडसे अध्यक्ष, राज्य मंडळ

शिष्यवृत्ती परीक्षेची काठिण्यपातळी जास्त म्हणूनही आक्षेप

राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीच्या भाषा आणि गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळी जास्त असल्याचा सूर व्यक्त झाला आहे. ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांच्या मते, ‘विद्यार्थ्यांचा वयोगट, बौद्धिक, मानसिक विकास पातळी, निर्धारित अभ्यासक्रमाच्या तुलनेत कठीण वाटल्या. काही अंशी अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असल्याचे निदर्शनास आले.

परीक्षा परिषदेच्या निकषांनुसार प्रश्नपत्रिका ३० टक्के सोपी, ४० टक्के मध्यम आणि ३० टक्के कठीण असणे अपेक्षित आहे. काठिण्यपातळीचा नीट विचार करून प्रश्नपत्रिका तयार न केल्याने विद्यार्थ्यांचा अनुभव त्रासदायक आणि आत्मविश्वास कमी करणारा आहे. वर्षभराच्या सरावाचा अपेक्षित उपयोग विद्यार्थ्यांना झाला नाही. बदलत्या शैक्षणिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलून विश्लेषण आणि विचारक्षमतेचे मूल्यमापन करणाऱ्या प्रश्नप्रकारांचा समावेश करणे गरजेचे आहे.’ परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे याबाबत म्हणाले, ‘शिष्यवृत्ती परीक्षा ही गुणवान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी आहे. काठिण्यपातळी व्यक्तीसापेक्ष असते. ती कोणासाठी जास्त, कोणासाठी कमी असू शकते. मात्र, आलेल्या तक्रारी, प्रतिसादानुसार अवलोकन करून तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील.’