तळेगावजवळ सहलीच्या एसटी बसला अपघात

बहुतांश विद्यार्थी साखर झोपेत होते.

१८ विद्यार्थी, ३ शिक्षक जखमी, चालक अत्यवस्थ

शाळेची शैक्षणिक सहल नेणाऱ्या एसटी बसने रस्त्यात बंद पडलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १८ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले. बसचा चालक अत्यवस्थ आहे. तळेगावजवळ बुधवारी (२५ डिसेंबर) पहाटे ही घटना घडली. या वेळी बहुतांश विद्यार्थी साखर झोपेत होते.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव खिंडीत बुधवारी पहाटे पावणेचार वाजता हा अपघात झाला. या अपघातामुळे या मार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक  काही काळ ठप्प झाली होती. सर्व जखमी विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बी. जे. खताळ विद्यालयातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील खताळ विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल अलिबाग, महाबळेश्वर, मुरूड, जंजिरा येथे गेली होती. एसटीमध्ये एकूण ४४ विद्यार्थी होते. दोन दिवसीय सहलीवरून परतत असताना बुधवारी पहाटे तळेगावजवळ हा अपघात झाला. बुधवारी लोणावळा येथून पहाटे पावणेदोनच्या सुमारास दोन बस संगमनेरकडे जाण्यासाठी निघाल्या. त्यातील संगमनेर आगाराची एक  बस (एमएच १४ बीटी ४१२८) तळेगाव खिंडीच्या उतारावर पहाटे पावणेचारच्या सुमारास आली असता रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या आणि बंद पडलेल्या ट्रॅक्टरच्या (एमएच १२ सीएम २४४४) ट्रॉलीला बसची जोरदार धडक झाली. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली होत्या. त्यातील एक  ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटली. त्यामुळे ऊस रस्त्यावर पसरला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने पलायन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St bus accident picnic akp