पुणे : पाच महिन्यांच्या बंदनंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे विभागात एसटीचे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होऊ लागले आहेत. त्यामुळे विभागातील सर्व बस स्थानके कार्यान्वित करण्यात आली असून, विविध मार्गावर गाडय़ांची संख्या वाढविण्यात येत असल्याची माहिती एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली. कामगार परतत असल्याने एसटीची खास ओळख असलेली ‘लाल परी’ आता स्थानकांत दिसू लागली आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण बंद पुकारला होता. या कालावधीत विविध आंदोलने आणि न्यायालयीन घडामोडी झाल्या. या दरम्यान एसटीचे कार्यालयीन आणि कार्यशाळांतील कर्मचारी मोठय़ा प्रमाणावर कामावर परतले होते. मात्र, चालक आणि वाहक अगदी तुरळक प्रमाणात कामावर होते. त्यामुळे खासगी वाहतूकदारांकडून चालविण्यात येणाऱ्या गाडय़ांवर भर देऊन महत्त्वांच्या मार्गावर प्रवासी वाहतूक करण्यात येत होती. कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला असून, २२ एप्रिलपूर्वी कामावर रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या चालक आणि वाहक कामावर परतू लागले आहेत.

एसटीच्या पुणे विभागाचे नियंत्रक अशोक सोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागातील बहुतांश चालक, वाहक आणि इतर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पिंपरी-चिंचवड या बसस्थानकांत प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. पुणे शहरातून नाशिक,औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, बारामती, महाबळेश्वर, ठाणे, दादर, बोरिवली, मुंबई, कल्याण या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी वारंवारितेने बसच्या फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे विभागातील भोर, नारायणगाव, राजगुरूनगर, तळेगाव, शिरूर, बारामती, सासवड, इंदापूर, दौंड आगाराकडूनही सर्व लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. २२ एप्रिलपर्यंत ग्रामीण विभागातील सर्व फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सोट यांनी केले आहे.