भाजपाने एस.टी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप होत आहे. यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केल आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 

गोपीचंद पडळकर म्हणाले, “संपाला काही राजकीय स्वरूप नाही. भाजपा तळागाळातील पक्ष आहे. आमची नाळ सर्व सामान्य माणसाशी जोडली गेलेली आहे. तसेच हे सरकार येडपीस झाल आहे. सरकारला सुचायचं बंद झालं आहे. तर इकड पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एस.टी कर्मचार्‍यांची मान्यताप्राप्त संघटना आहे. तसेच पवारांनी मान्यताप्राप्त संघटनांना ५० वर्ष हाताशी धरून कर्मचार्‍यांवर अन्याय केलेला आहे. त्या अन्यायाची जाणीव राज्यातील १ लाख कर्मचार्‍यांना झालेली आहे.”

“आजपर्यंत 38 एस.टी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी सरकार निर्णय घेत नसून केवळ चालढकल करीत आहे. तसेच जोवर निर्णय होत नाही. तोपर्यंत संप चालेल आणि संपाचे नेतृत्व आम्ही करीत नसून कर्मचारी करीत आहेत. पण मला सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की,यावर काही तरी निर्णय घ्या”, असे देखील पडळकर म्हणाले.