केंद्र सरकारच्या १३ विभागांमध्ये तब्बल २० हजार पदे सध्या रिक्त असून त्याबाबत स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची माहिती देण्यासाठी सूर्योदय एज्युकेशन या संस्थेतर्फे सोमवारी चिंचवड आणि पुणे येथे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या विविध विभागांतील पदे कम्बाईल ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामच्या म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. या परीक्षेमधून सबइन्स्पेक्टर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर, यांसारख्या पदांची भरती करण्यात येते. या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून २७ एप्रिल आणि २ मे रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेबाबत सूर्योदय एज्युकेशन या संस्थेतर्फे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (३ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे आणि सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ही शिबिरे होणार आहेत.
‘‘या परीक्षांबाबत महाराष्ट्रात पुरेशी जागृती नसल्यामुळे त्याला महाराष्ट्रातील उमेदवारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळतो. मात्र, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून करण्यात येणारी २० हजार पदांची भरती ही प्रशासनामध्ये जाण्याची उत्तम संधी आहे,’’ असे सूर्योदय एज्युकेशनचे भूषण कदम यांनी सांगितले.