पुणे : दीर्घिकांमधील अणू हायड्रोजन एक अब्ज वर्षांत मोठय़ा प्रमाणात घटल्याने ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग मंदावल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (यूजीएमआरटी) साहाय्याने हे संशोधन करण्यात आले असून, ब्रह्मांडातील तारेनिर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन दिशादर्शक ठरू शकणार आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) पीएच.डी.चा विद्यार्थी आदित्य चौधरी, प्रा. निस्सीम काणेकर, प्रा. जयराम चेंगलूर यांचा या संशोधनात सहभाग आहे. या संशोधनाचा शोधनिबंध ‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवळपास १३ अब्ज वर्षांपूर्वी दीर्घिकांमध्ये अणू हायड्रोजनचे प्रमाण मुबलक असल्याने ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग प्रचंड होता.  त्यात आठ ते दहा अब्ज वर्षांपूर्वी सर्वाधिक ताऱ्यांची निर्मिती झाली. मात्र आठ अब्ज वर्षांपूर्वी तारे निर्मितीचा वेग का कमी झाला याचे उत्तर वैज्ञानिकदृष्टय़ा मिळू शकले नव्हते.  चौधरी म्हणाले, की जवळपास आठ अब्ज वर्षांपूर्वी ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग कमी झाला. तारे निर्मितीसाठी आवश्यक अणू हायड्रोजनचे सरासरी मोजमाप केले असता अणू हायड्रोजनचे प्रमाण कमी झाल्याने ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग मंदावल्याचे दिसून आले.  अणू हायड्रोजनचे सरासरी वस्तुमान जवळपास एक अब्ज वर्षांहून अधिक वेगाने कमी झाले. आठ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकांमध्ये नऊ अब्ज वर्षांपूर्वी समान तारकीय वस्तुमान असलेल्या दीर्घिकांच्या तुलनेत जवळपास तिप्पट कमी अणुवायू असल्याचे प्रा. काणेकर यांनी नमूद केले.

थोडी माहिती..

आजपासून आठ ते नऊ अब्ज वर्षांपूर्वी अणू हायड्रोजनचे कमी झालेले प्रमाण मोजण्यासाठी २०१८ ते २०२० या कालावधीत जवळपास पाचशे दहा तास निरीक्षणे यूजीएमआरटीच्या साहाय्याने करण्यात आली.

शोधाचे महत्त्व..

आठ ते अकरा अब्ज वर्षांपूर्वी ब्रह्मांडातील दीर्घिकांनी दहा पट अधिक तारे तयार केले होते. मात्र दीर्घिकांनी याच वेगाने तारे तयार करणे का थांबवले हे आजपर्यंतचे एक रहस्य होते. त्यामुळे सुरुवातीच्या दीर्घिकांतील अणू हायड्रोजन वायूचे प्रमाण मोजून या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून सुरू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stars slowed down causes decrease amount hydrogen findings research ysh
First published on: 01-07-2022 at 00:02 IST