उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तीन दिवस तीव्र थंडी लाट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागात पुढील तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. विशेषत: पुणे, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या शहरातील किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरणार येणार आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यातील किमान तापमानाची कमालीची घट झाली होती. थंडीची ही लाट शुक्रवापर्यंत (२८ फेब्रुवारी) राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर प्रदेशच्या उत्तर-पश्चिम भागावर पश्चिमी चक्रावात आणि चक्रीय स्थिती सक्रिय आहे. तसेच २९ जानेवारीला हिमालयाच्या भागात आणखी एक नवीन पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. या पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव तीव्र असून जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तरखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा, पंजाब, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये दाट धुक्यासह कडाक्याची थंडी पडणार आहे. या अतितीव्र थंडीच्या लाटेमुळे काही राज्यात हिमवर्षांव तसेच काही ठिकाणी पाऊस देखील पडण्याची दाट शक्यता आहे. ही थंडीची लाट पुढील पाच दिवस राहणार असून किमान तापमानाचा पारा तीन ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरणार आहे.

नाशिकमध्ये ६.३ अंश

दिवसभरात सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद नाशिक येथे ६.३ अंश सेल्सिअस, तर सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद २९.२ अंश सेल्सिअस सोलापुरात करण्यात आली. पुणे शहरात यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी किमान तापमान ८.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच मुंबईत १५.२ अंश सेल्सिअस, सांताक्रुझ १३.४, रत्नागिरी १४.१, नगर ७.९, कोल्हापूर १३.८, महाबळेश्वर ८.८, सांगली १३.५, सातारा १४, औरंगाबाद ८.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

मुंबईसह कोकणातही थंडी

राज्याचा विचार केल्यास पुढील तीन दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात थंडीची लाट येणार आहे. या लाटेमुळे किमान तापमान सरासरीपेक्षा खाली येणार आहे. मुंबईसह कोकणातही चांगलीच थंडी पडणार आहे. राज्याच्या सर्वच भागात हवामान कोरडे राहणार असल्याने थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर भारतात आलेल्या अतितीव्र थंडीच्या लाटेमुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्र,  मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन दिवस थंडीची लाट येणार आहे. परिणामी राज्याच्या उर्वरित भागातही सरासरीपेक्षा जास्त थंडी राहील, असे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State collapsed cold wave ysh
First published on: 26-01-2022 at 00:02 IST