पुणे : एका वृद्धाश्रमचालकाने १२ वृद्ध रुग्णांना कोणताही निवारा न देता उघड्यावरच ठेवल्याची बाब उघडकीस आली होती. त्यामुळे वृद्ध रुग्णांना वृद्धाश्रम चालकाच्या ताब्यात सोपविणाऱ्या ससून रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याप्रकरणी चौकशी समितीने ससूनमध्ये सात तास चौकशी केली. या चौकशीचा अहवाल समितीकडून लवकरच राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
वृद्धाश्रमाकडे असलेले १२ वृद्ध रुग्ण आधी उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर कोणी नातेवाइक त्यांना नेण्यास आले नाहीत. ते बेवारस असल्याचे गृहीत धरून ससून प्रशासनाने त्यांना वृद्धाश्रमाकडे सोपविले. मात्र, वृद्धाश्रम संचालकांनी त्या रुग्णांना खासगी कंपनीसमोरील जागेत उघड्यावर आणून ठेवल्याचा आरोप आहे. वृद्धाश्रमासाठी सरकारने मोफत जागा द्यावी, अन्यथा या वृद्धांचा सांभाळ करणे शक्य नसल्याची भूमिका त्याने घेतली होती.
यातील ११ रुग्णांना समाजकल्याण विभागाने गुरुवारी (ता. २०) जनसेवा फाउंडेशनच्या आंबी येथील वृद्धाश्रमात पाठविले. एक रुग्ण आजारी असल्याने त्याला ससूनमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चौकशीचा आदेश दिला होता. त्यानुसार त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे असून, सदस्यपदी मुंबईतील जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक गजानन चव्हाण आहेत. या समितीने शुक्रवारी २१ नोव्हेंबरला ससून रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करावी आणि त्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांनी दिले होते.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तीन सदस्यीय चौकशी समितीने शुक्रवारी सकाळी ससूनमध्ये दाखल होऊन चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, उपअधीक्षक, समाजसेवा अधीक्षक यांच्यासह सुमारे १६ ते १७ जणांची चौकशी झाली. ही चौकशी सुमारे सात तास सुरू होती. चौकशी समितीने ससूनमधून वृद्धाश्रमाकडे पाठविण्यात आलेल्या रुग्णांची माहिती घेतली. त्याचबरोबर संस्थेच्या नोंदणीबाबत माहिती घेतली.
रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आलेले प्रकाश पुरोहित या रुग्णाबद्दलही चौकशी करण्यात आली. पुरोहित यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चौकशी समितीकडून दिवसभरात १६ ते १७ जणांची चौकशी करण्यात आली. या सर्वांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. बेपत्ता रुग्णप्रकरणीही समितीने चौकशी केली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच राज्य सरकारकडे कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल. – डॉ. पल्लवी सापळे, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग
