पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण सोडत झाल्यानंतर आता प्रभागनिहाय मतदारयादी जाहीर होण्याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. यासाठी महापालिकेच्या मतदारयादी कक्षाने पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीचे प्रभागनिहाय विभाजन केले आहे. त्यात एक जुलै २०२५ पर्यंत नोंदणी असलेल्या मतदारांची नावे आहेत. मात्र, मतदार यादी प्रसिद्ध करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुरुवातीला सहा नोव्हेंबर रोजी यादी प्रसिद्ध केली जाणार होती. त्यानंतर १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

आता पुन्हा मुदतवाढ दिली असून, २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती, सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. त्यावर निर्णय घेऊन पाच डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. आठ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची आणि १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयानिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहायक नगर रचनाकार प्रशांत शिंपी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, सहायक आयुक्त राजीव घुले, किरणकुमार मोरे, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, प्रशासन अधिकारी सरीता मारणे, संगीता बांगर व कार्यालय अधीक्षक रमेश यादव या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कर्मचारी काम करणार आहेत.

आरक्षण सोडतीवर सोमवारपासून हरकती स्वीकारणार

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत ११ नाेव्हेंबरला काढण्यात आली. या सोडतीवर हरकती व सूचना सोमवारपासून (१७ नोव्हेंबर) स्वीकारण्यात येणार आहेत. २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जातील. सूचना व हरकती महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक विभागात, तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत.