पुणे : राज्य सरकार उद्योगांना सुविधा देण्यासह त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध निर्णय घेत आहे. देशात पुणे जिल्हा औद्योगिकृष्ट्या महत्वाचा असून, उद्योगांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने बारामतीनंतर आता चाकणमधील उद्योगांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. जागतिक आणि देशातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्या चाकणमध्ये असून, चाकण हे मोठे निर्मिती केंद्र आहे. याचा फायदा आगामी काळात चाकणमधील उद्योगांना होणार आहे.
राज्य सरकारने उद्योगांना त्यांच्या परिसरात सुविधा देण्याचे पाऊल उचलले आहे. प्रत्येक औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुविधा उद्योगांना मिळाव्यात, या हेतूने नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत मंडळाच्या सुधारित आकृतीबंधाला सरकारने मंजुरी दिली. सुधारित आकृतीबंधानुसार पदांची संख्या १ हजार ३०१ होणार आहे. आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर सर्वप्रथम बारामतीमध्ये मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर आता चाकणमध्ये उपप्रादेशिक कार्यालय सुरू होणार आहे. यामुळे उद्योगांच्या समस्या सुटण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.
‘जिल्ह्यातील उद्योजकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामासाठी पुण्यात यावे लागते. त्यांचा खूप वेळ वाया जातो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रांच्या परिसरात मंडळाची कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. पुण्यात आधी बारामतीमध्ये उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले. आता चाकणमध्ये उपप्रादेशिक कार्यालय सुरू होत आहे. या कार्यालयांच्या माध्यमातून स्थानिक उद्योगांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देता येईल. याचबरोबर उद्योगांच्या समस्या तातडीने सोडविण्यास मदत होणार आहे,’ अशी माहिती मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी दिली.
अधिकाऱ्यांची संख्या तिप्पट
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मंडळातील अधिकाऱ्यांची संख्या तिप्पट होणार आहे. राज्यात मंडळाची नवीन कार्यालये सुरू करण्याचे नियोजन आहे. मंडळाच्या कामासाठी उद्योजकांना जास्त दूर जावे लागू नये, यासाठी त्यांच्या परिसरातच कार्यालये सुरू करण्यावर भर आहे. बारामती आणि चाकणमध्ये उपप्रादेशिक कार्यालये झाली तरी प्रादेशिक कार्यालय पुण्यातच असणार आहे. सर्व मुख्य कामकाज पुण्यातील कार्यालयातूनच चालेल,’ असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले.
उद्योजकांचा वेळ वाचेल
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी निगडित मंजुरी अथवा परवानगी घेण्यासाठी चाकणमधील उद्योजकांना पुण्याला जावे लागत होते. आता चाकणमध्ये मंडळाचे कार्यालय सुरू झाल्याने हा वेळ वाचणार आहे. याचबरोबर उद्योगांच्या तक्रारींवर तातडीने तोडगा निघू शकतो. उद्योगांबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची वस्तुस्थितीही मंडळाला लवकर समजण्यास मदत होईल,’ अशी प्रतिक्रिया फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल यांनी व्यक्त केली.
नवीन कार्यालय कुठे?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक चारमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मंडळाने कॅपिटल स्क्वेअर या संकुलातील २३२ चौरस मीटर जागा कार्यालयासाठी भाडेतत्वावर घेतली आहे. यासाठीचा भाडेकरार २ मार्चला मंडळाने केला असून, त्याची मुदत पाच वर्षांसाठी आहे.
