पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात समीर गायकवाड याला संशयावरून अटक करण्यात आली आहे. या हत्येमागे कोणती संस्था आहे किंवा कोणत्या हेतूने त्यांची हत्या झाली, हे तपासात स्पष्ट होईलच. त्यामुळे विनाकारण ‘मीडिया ट्रायल’ करून तपासाला वेगळे वळण देऊ नये, असे आवाहन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
पानसरे हत्या प्रकरणामध्ये गायकवाड याला अटक करण्यात आल्यानंतर शिंदे हे प्रथमच माध्यमांसमोर आले. पानसरे यांच्या हत्येमागे कोणती संस्था किंवा संघटना आहे. त्याचप्रमाणे कोणत्या हेतूने ही हत्या केली, अशा प्रकारचे प्रश्न शिंदे यांना काहींकडून करण्यात आले. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, ‘पानसरे यांच्या हत्येचा तपास विशेष महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. तपासात दिरंगाई होऊ नये, यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणात समीर गायकवाड याला संशयावरून अटक करण्यात आली आहे. गायकवाड याच्याविषयी काही धागेदोरे मिळाल्यानेच त्याला अटक झाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात केवळ गायकवाड यालाच अटक झाली आहे. त्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व गोष्टी उघड होतील. त्यामुळे या प्रकरणात सध्या तरी कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

तपासानंतरच ‘सनातन’वर बंदीबाबत विचार
सनातन या संस्थेवर बंदीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा करण्यात येत असल्याचे सांगून राम शिंदे म्हणाले, विरोधी पक्ष व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सनातनवर बंदीची मागणी केली आहे. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही. हा तपास नि:पक्षपाती व्हावा, हीच आमची इच्छा आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या कालावधीतही सनातनवर बंदीची मागणी झाली होती. त्या वेळी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. सध्या सुरू असलेल्या तपासात अनेक बाबी उजेडात येतील. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच सनातनवरील बंदीबाबत निर्णय घेतला जाईल.