राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांची अंमलबजावणी २०२४-२५पासून करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मात्र जाहीर केल्यानुसार २०२३पासून अंमलबजावणीच्या निर्णयात कोणताही  बदल करण्याचा विचार नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरुवारी स्पष्ट केले. 

एमपीएससीने राज्यसेवा परीक्षेतील बदलांसाठी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने सादर केलेल्या शिफारशींनुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्यासह अभ्यासक्रमात बदल करण्याची शिफारस समितीने केली. या शिफारसी स्वीकारून राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमातील बदलांबाबतचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी घेतला. तसेच २०२३पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र गेली काही वर्षे उमेदवार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षेची तयारी करत असल्याने नव्या वर्णनात्मक परीक्षेच्या तयारीसाठी थोडा वेळ मिळण्याच्या दृष्टीने २०२४-२५पासून निर्णयाची अंमलबजीवणी करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. 

या पार्श्वभूमीवर एमपीएससीने नवी परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाती  बदलांच्या अंमलबजावणीबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. ‘राज्य सेवा मुख्य परीक्षाकरिता नवीन परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही,’ असे नमूद करण्यात आले आहे. तसेच काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून करण्यात येणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.