लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली असून या समित्यांची बैठक १७ जूनला मुंबईत होईल. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल.

बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलन राज्यव्यापी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, संघटनांची एस. एम. जोशी सभागृह येथे मंग‌ळवारी बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंदोलनाविषयी माहिती देण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर, सत्यजित चव्हाण, सुभाष वारे, किशोर जाधव, नितीन पवार, लता सोनावणे, बारसू येथील ग्रामस्थ काशीनाथ गोरले, प्रतीक्षा कांबळी, निशा तेरवणकर आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा… पुणे: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून

डॉ. पाटणकर म्हणाले, की रिफायनरीचा प्रश्न केवळ बारसू आणि जवळच्या गावाचा प्रश्न आहे असा समज आहे. पण हा महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रश्न आहे. बारसू ऐवजी अन्य भागात नेण्याची सूचना पुढे आली. पण पर्यावरणाचे नुकसान होणार नाही असा कोणताही प्रदेश नाही. बारसूचा प्रश्न हा महाराष्ट्राचा प्रश्न समजून लढण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्रव्यापी लढा समिती आणि अभ्यास समिती स्थापन करण्यात आली. अभ्यास समिती बारसू प्रकल्पाला पर्यायांच विचार करून प्राथमिक आराखडा सादर करेल. या दोन्ही समित्यांची १७ जूनला मुंबईत समितीची बैठक होईल. ऊर्जा पाहिजे, इंधन पाहिजे, पण ते निसर्गाला हानी करून, माणसांच्या आरोग्याचे नुकसान करून नको. दडपणशाही करणाऱ्यांना लढ्याच्या माध्यमातून संदेश दिला जाईल.

हेही वाचा… Video : संचेती पुलावर चढून तरुणाची ‘स्टंटबाजी’

बारसू येथील सड्यावर जैवविविधता आहे. त्यात अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत. मात्र प्रस्तावित प्रकल्पामुळे ही जैवविविधता आणि मानवी आरोग्य धोक्यात आले आहे, असे सत्यजित चव्हाण यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statewide agitation against the proposed refinery at barsu pune print news ccp 14 dvr
First published on: 30-05-2023 at 19:16 IST