महापालिकेच्या औषध खरेदीत सुरू असलेला घोटाळा थांबवण्याच्या दृष्टीने अखेर वादग्रस्त औषध खरेदीला स्थगिती देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी एकमताने घेतला. या घोटाळ्याची चौकशी करून चौकशी अहवाल आठ दिवसांत स्थायी समितीपुढे ठेवावा, असा आदेश या वेळी आयुक्तांना देण्यात आला. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
महापालिकेच्या स्थायी समितीने गेल्या मंगळवारी तीन कोटी रुपयांच्या कीटकनाशक खरेदीचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. मात्र ही खरेदी दुप्पट दराने होत असल्याचा प्रकार सजग नागरिक मंचने त्याच दिवशी उघडकीस आणला आणि औषध खरेदीतील विविध घोटाळे नंतरही उजेडात आले. त्यामुळे या खरेदीचा फेरविचार करावा, असा ठराव नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि हेमंत रासने यांनी स्थायी समितीला दिला होता. हा ठराव समितीने मंगळवारी एकमताने मंजूर केला.
या खरेदीबाबत सुतार आणि रासने यांनी समितीत अनेक प्रश्न व आक्षेप उपस्थित केले. मात्र, आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांना त्यावर समाधानकारक खुलासा करता आला नाही. हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्यामार्फत आला होता. त्यामुळे तेही काही प्रश्नांवर उत्तरे देत होते. मात्र, हा खुलासाही सदस्यांना पटला नाही. त्यानंतर फेरविचाराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच खरेदीप्रक्रियेला स्थगिती देण्याचाही निर्णय समितीने घेतला. या खरेदीचे दर पाहता महापालिका शासनदरांपेक्षा दुप्पट दराने खरेदी करत असल्याचे दिसत आहे तसेच करार पद्धतीने खरेदी केल्यास त्यात फायदा असतानाही निविदा मागवून खरेदी कशासाठी करण्यात येत आहे, आदी प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आले.
या औषध खरेदीच्या प्रस्तावाची आयुक्तांनी तातडीने चौकशी करून चौकशीचा अहवाल आठ दिवसांत स्थायी समितीपुढे ठेवावा, असाही निर्णय घेण्यात आला असून तसा आदेश प्रशासनाला देण्यात आला. या अहवालात जे या खरेदीत दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समिती घेईल तसेच निविदांऐवजी करार पद्धतीने औषधे घेण्यासंबंधीचाही निर्णय आम्ही घेणार आहोत, असेही तांबे यांनी सांगितले.