पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये, यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. क्यूआर कोड आणि बारकोडच्या साह्याने मतपत्रिकेची द्विस्तरीय पडताळणी होणार असून, त्याद्वारे मतपत्रिका मूळ मतदारानेच पाठवली असल्याची खातरजमा करून घेण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी आणि सहनिवडणूक अधिकारी गिरीश केमकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या घोषित कार्यक्रमानुसार गुरुवारपासून (५ फेब्रुवारी) परिषदेच्या आजीव सभासदांना टपाल खात्याच्या स्पीड पोस्टाने मतपत्रिका रवाना करण्यात येणार आहेत. मतदारांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच क्यूआर कोडने सुरक्षित केलेल्या पाकिटातून या मतपत्रिका पाठविण्यात येणार आहेत.
मतपत्रिकेवर क्यूआर कोड असून, मतपत्रिका निवडणूक मंडळाने बारकोडसह पाठविलेल्या पाकिटातूनच परत पाठवायच्या आहेत. मतपत्रिका आल्यावर निवडणूक अधिकारी हा क्यूआर कोड आणि बारकोड स्कॅन करून त्यात असलेल्या क्रमांकाची मतदाराच्या क्रमांकाशी पडताळणी होईल. हे दोन्ही कोड स्कॅन करण्याची सुविधा फक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडे असल्याने मतदाराने मतपत्रिकेत कोणताही फेरफार केल्यास ते उघडकीस येऊ शकणार आहे. याद्वारे बोगस मतदानाला आळा घालण्याचा प्रयत्न असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
‘या निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक मतपत्रिकेवर विशेष क्यूआर कोड, वॉटरमार्क टाकण्यात आला आहे. मतपत्रिकेच्या मागील बाजूस मतदानासाठी विशेष सूचना आणि नियमही छापण्यात आले आहेत,’ असे केमकर यांनी सांगितले.
‘सर्व सूचनांचे पालन करून मतदारांनी निवडणूक मंडळाने बारकोडसह पाठविलेल्या पाकिटातूनच ही मतपत्रिका टपाल खात्याच्या नियमानुसार योग्य टपाल तिकीट लावूनच निवडणूक मंडळाकडे परत पाठविणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे सीलबंद करून आणि सोबत स्वसाक्षांकित आधारकार्ड किंवा पॅनकार्डची प्रत मतपत्रिकेसोबत जोडणे अनिवार्य आहे. अन्यथा, ती मतपत्रिका बाद ठरविण्यात येईल,’ असे सहनिवडणूक अधिकारी संजीव खडके यांनी स्पष्ट केले.
मतपत्रिकांच्या पळवापळवीला प्रतिबंध
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांची पळवापळवी झाल्याची अनेक उदाहरणे होती. टपाल कार्यालयामध्ये पोस्टमनला गाठून मतपत्रिका ताब्यात घेऊन आपल्याला अनुकूल शिक्के मारून एकगठ्ठा मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्याकडे सोपविल्या जात असल्याचे आरोप झाले होते. या सगळ्या प्रकारात मतपत्रिका मूळ मतदारापर्यंत पोहोचण्यात अनेकदा उमेदवारच अडसर ठरायचे. एखाद्या जागरूक मतदाराने आपला हक्क बजावण्यासाठी आग्रह धरला, तर त्याला दुबार मतपत्रिका दिली जायची. त्या बरोबरीने चोरीला गेलेली मूळ मतपत्रिकादेखील दाखल होत असे. आता यंदाच्या निवडणुकीत क्यूआर कोड आणि बारकोडच्या साह्याने मतपत्रिकेची द्विस्तरीय पडताळणी होणार असल्याने मतपत्रिकांच्या पळवापळवीला प्रतिबंध बसणार आहे.

