पुणे : मद्यपान करून इमारतीत धिंगाणा घालणऱ्यांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाला टोळक्याने बेदम मारहाण करून डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी केले. ही घटना लोहगावमधील कलवड वस्ती येथे घडली.

यासंदर्भात शुभम चिंचोले, रोहन गायकवाड, ऋषीकेश नेवाळे, सुमीत लंगडे, अभि तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित रजक (वय ३८ रा. आंबेडकर चौक, येरवडा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अमित हे सुरक्षारक्षक असून रात्री साडेआठच्या सुमारास ते कामावर हजर होते. त्यावेळी शेजारील सदनिकेमध्ये चार ते पाचजण मद्यपान करून धिंगाणा घालत होते. त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता, टोळक्याने अमित यांना धक्काबुक्की करीत अरेरावी केली. इतर साथीदारांना बोलावून हातात कोयते घेउन दहशत माजविली. त्यानंतर अमित यांच्या डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाणे तपास करीत आहेत.