देशभरातील ३०० हून अधिक जनआंदोलनांच्या पुढाकाराने आजपासून (२ ऑक्टोबर) ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानाची सुरुवात होत आहे. पुण्यातही विविध संघटना-जनआंदोलने व जागरुक नागरिकांच्या सहभागाने आज महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करत प्रारंभ झाला. देशात जाणीवपूर्वक विद्वेषाचे आणि अविश्वासाचे वातावरण पसरवले जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. तसेच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनिती सु. रं. म्हणाल्या, “देशात जाणीवपूर्वक विद्वेषाचे आणि अविश्वासाचे वातावरण पसरवले जात आहे. हे वातावरण बदलून परस्पर सौहार्द, सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावावर आधारित ‘आयडिया ऑफ इंडिया’ पुन्हा एकदा समाजमानसात रुजवायला हवी. महागाई, बेरोजगारी, शेतकरी-कष्टकऱ्यांची लूट असे गंभीर प्रश्न ऐरणीवर आणायला हवेत.”

“सत्ताधाऱ्यांकडून होणारी लोकशाही प्रक्रिया आणि संरचनांची पायमल्ली आणि नागरिकांच्या हक्कांची गळचेपी याविरोधात निर्भयपणे उभे राहणे हा या अभियानाचा उद्देश आहे,” अशी माहिती जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय समन्वयक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिती सु.र. यांनी दिली. गांधीजींच्या अहिंसेच्या आणि निर्भयतेच्या मार्गाने आपल्याला ही वाटचाल करायची आहे, असा निर्धार नागरिक हक्क सुरक्षा समिती व स्वराज अभियानाचे नेते मानव कांबळे यांनी व्यक्त केला.

संविधानातील तत्वांच्या प्रचाराचं काम करणारे सुभाष वारे, कष्टकऱ्यांचे नेते नितीन पवार, कष्टकरी संघर्ष महासंघाचे नेते काशीनाथ नखाते, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर, स्त्रीपुरुष समतेच्या चळवळीतील कार्यकर्त्या अर्चना मोरे, सर्वोदयी कार्यकर्त्या यामिनी चौधरी, शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्या गौरी देशमुख अशा अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी देशात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच अभियानाला आपला पाठिंबा दिला.

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे तरुण कार्यकर्ते व अलका पावनगडकर यांच्या आशयपूर्ण गीतांतून निर्धार व्यक्त झाला. राजेंद्र बहाळकर यांनी सूत्रसंचालन केले. इब्राहीम खान, अस्लम बागवान, सुहास कोल्हेकर, प्रसाद बागवे, रमाकांत धनोकर, संजय मा.क., प्रियांका सोनवणे, श्वेता ढेंबरे व अन्य अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागातून ‘नफरत छोडो – भारत जोडो’ व ‘संविधान बचाओ – देश बनाओ’ हा संदेश देत आज या अभियानाचे उद्घाटन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले.

हेही वाचा : चतु:सूत्र : यंत्र हवे, पण ते ‘माणसा’साठी!

कार्यक्रमाच्या शेवटी गांधीपुतळ्याच्या समक्ष संविधानाच्या प्रास्ताविकेचे सहवाचन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मिरवणुकीने जाऊन तेथे या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या मुद्द्यांवर लोकसंवाद करण्यासाठी २ ऑक्टोबर ते १० डिसेंबर दरम्यान देशातील सुमारे ५०० जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ७५ किलोमीटर्सच्या पदयात्रा काढण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातही अशा तीन पदयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आयोजक राजेंद्र बहाळकर, इब्राहिम खान यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop hatred save constitution mission started in pune on mahatma gandhi birth anniversary pbs
First published on: 02-10-2022 at 15:39 IST