प्रेरणा : वेळेचा सदुपयोग

हेमंत कुलकर्णी हे त्यापैकीच एक नाव. ते मूळचे बांधकाम व्यावसायिक.

बाळासाहेब या नावाने परिचित असणाऱ्या या कार्यकर्त्यांने भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आनंद देण्याचा जणू वसाच घेतलेला. पुणे मराठी ग्रंथालयाचे माजी कार्यवाह आणि आता अभ्यासिका निमंत्रक असणारे बाळासाहेब ग्रंथालयाच्या आवारात असले, की तेथील वातावरण चतन्याने फुलून गेलेले असते.

घडय़ाळाचे काटे कायमच सरकत राहतात. ज्यांना खूप काम असते, त्या माणसांना या काटय़ांनी कुठेतरी थांबवावेसे वाटते, तर ज्यांना विविध कारणांनी काहीच काम नाही त्यांना हे काटे भराभर का सरकत नाहीत, याचे वैषम्यही वाटते. नोकरी-व्यवसायातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर बहुतांशी मंडळी आपल्या वेळेचे नियोजन करतात पण बहुतांशी वेळा ते स्वत:च्या आरामासाठीचेच असते. निवडक मंडळींना मात्र सामाजिक बंध जपावे असे वाटते आणि त्या दिशेने ती मंडळी वाटचाल देखील करतात. हेमंत कुलकर्णी हे त्यापैकीच एक नाव. ते मूळचे बांधकाम व्यावसायिक. आज त्यांनी त्यांच्या कामाचा व्याप जरी कमी केला असला, तरी देखील काही मोठी कामे त्यांच्याकडे आवर्जून येतात आणि ते आपल्या अनुभवांच्या जोरावर ती योग्य प्रकारे पूर्णही करतात. ही कामे करत असतानाही त्यांच्याकडे बराच वेळ मोकळा असतो (अर्थात योग्य नियोजनामुळे) त्याचेही त्यांनी नियोजन केले आहे आणि तेही सामाजिक कार्यासाठी.

बहात्तर वर्षांचे कुलकर्णी सांगलीतील चिकुरडे गावचे. तेथे जन्म झाल्याचा त्यांना सार्थ अभिमान जसा आहे, तसेच आपल्या सामाजिक कार्याचे श्रेय देखील ते या गावालाच देतात. या गावातून शहरात आल्यानंतर ज्या अडचणी येतात, त्यांचा अनुभव, त्यांच्या कामात त्यांना उपयोगी पडतो. हे काम करत असताना, आपण कोणतेही सामाजिक कार्य करत असल्याचा आविर्भाव अर्थातच त्यांच्या वागण्यातून दिसत नाही. त्यामुळेच ते आपल्या कार्यक्षेत्रात सर्वाचेच लाडके असणारे व्यक्तिमत्व.

बाळासाहेब या नावाने परिचित असणाऱ्या या कार्यकर्त्यांने भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आनंद देण्याचा जणू वसाच घेतलेला. पुणे मराठी ग्रंथालयाचे माजी कार्यवाह आणि आता अभ्यासिका निमंत्रक असणारे बाळासाहेब ग्रंथालयाच्या आवारात असले, की तेथील वातावरण चतन्याने फुलून गेलेले असते. अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांवर त्यांचे बारीक लक्ष असते, ते अर्थातच तेथे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी घडावे, या तळमळीतून.

अभ्यासिकेत येणारी बहुतांशी मुले गावाकडची. पुण्यासारख्या शहरी वातावरणात करीयर घडविण्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना पुण्यात आलेल्या दिवसांपासूनच अडचणींचा सामना करावा लागतो. राहण्याच्या जागेपासून जेवणाच्या व्यवस्थेपर्यंत. येथे आल्यानंतर जी मुले एका ध्येयाने झपाटलेली असतात, पण ज्यांना नजरेच्या टप्प्यातही ध्येय दिसत नाही, ती मुले निराश व्हायला लागतात. त्यांच्या उत्साहाचे रूपांतर नैराश्यात होऊ लागते.

अशा अनेक ठिकाणी बाळासाहेबांचे सामाजिक कार्य सुरू होते. यांचे अनेक प्रश्न असतात. या मुलांचे प्रश्न, त्यांचे नैराश्य बाळासाहेबांना कळायचाच अवकाश, की त्या मुलांना उभारी देण्यापासून त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवण्यासाठी ते अग्रेसर होतात. या सगळ्यामधूनच बाळासाहेबांनी या मुलांचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मिळवली आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे या मुलांचा अभ्यासातील आणि जीवनातीलही उत्साह वाढतो. आपण घर सोडून आलोय पण येथेही आपले माणूस आहे, या विश्वासाने मुले अभ्यास करतात. ते मुलांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ठरवतात आणि ते योग्य प्रकारे घेतातही. जेणेकरून येथे आलेला विद्यार्थी आरोग्यदायी वातावरणात अभ्यास करेल आणि जीवनातील योग्य मार्गावर वाटचाल करेल. त्या विद्यार्थ्यांना केवळ पुढे नेणेच नाही तर त्यांना स्वतच्या विचारावर, पायांवर उभे करण्यासाठी बाळासाहेब सदैव नवीन गोष्टींसाठी आग्रही असतात. बाळासाहेब देखील ग्रामीण भागातून आलेले असल्यामुळे त्यांची या मुलांबरोबर एक नाळ जोडली आहे.

बाळासाहेबांच्या घरातील वातावरण कडक होते. सूर्यनमस्कार आणि रोजचा व्यायाम झाला तरच दूध मिळणार असा आई-वडिलांचा निग्रह. हे झाले नाही तर काहीही खायला-प्यायला मिळायचे नाही. त्यामुळे व्यायामाची सवय लहानपणीच लागलेली. रा. स्व. संघाच्या वातावरणात वाढलेले असल्याने सर्व गोष्टी नियोजनबद्ध रीत्या करण्यात आग्रही असलेले बाळासाहेब विद्यार्थ्यांमध्ये देखील शिस्तप्रियता यावी, म्हणून प्रयत्नशील असतात.

शरीरात जसे रक्त सळसळत असते, तसे माणसांनी सतत ध्यास घेऊन काम केले पाहिजे आणि हसत जगले पाहिजे, सकारात्मक विचार चालू राहिले पाहिजेत, रडत बसण्यात अर्थ नसतो. जीवन आनंदी होण्यासाठी जगले व झटले पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार. या विचारांनी ते कायमच विद्यार्थ्यांना, ग्रंथालयातील कर्मचारी वर्गाला प्रोत्साहित करीत राहतात. सकाळ आणि संध्याकाळचे काही तास त्यांनी या कार्याला दिलेले आहेत. अनेक शारीरिक व्याधी, शस्त्रक्रियांमधून ठणठणीत बरे झाल्यानंतरही त्यांनी आपले सामाजिक कार्य तेवढय़ाच जोमाने सुरू ठेवले आहे, तेही नवतरुणाच्या उत्साहात.

shriram.oak@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Story of hemant kulkarni

ताज्या बातम्या