Premium

पिंपरी महापालिकेचा अजब कारभार; बक्षिसाची रक्कम विद्यार्थ्यांना दिली दोनवेळा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाने  दहावी व बारावीतील २५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर १० हजारांऐवजी दुप्पट २० हजार रुपये जमा केले आहेत.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation
पिंपरी-चिंचवड महापालिका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाने  दहावी व बारावीतील २५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर १० हजारांऐवजी दुप्पट २० हजार रुपये जमा केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना दोनवेळा बक्षिसाची रक्कम दिल्याने पालिकेला २५ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. रक्कम परत मिळविण्यासाठी  विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, काही विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनेद्वारे विद्यार्थी, महिला व नागरिकांना आर्थिक लाभ दिला जातो. दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना आहे. दहावी व बारावीमध्ये मध्ये ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये दिले जातात. तर, ८० ते ९० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दिले जातात. यासाठी विभागाच्या वतीने पात्र लाभार्थ्यांकडून दहावी, बारावीची गुणपत्रिका, आधारकार्ड, शहरात वास्तव्यास असल्याचा पुरावा, बॅंक खाते व पासबुक आदीची झेरॉक्‍स प्रत जमा करून घेतली जाते.

हेही वाचा >>> ‘तो’ देऊन गेला तिघांना जीवदान! हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड प्रत्यारोपणामुळे नवीन आयुष्य

त्यानुसार, विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्च महिन्यामध्ये आर्थिक लाभ देण्यास सुरुवात होते. त्यासाठी विभागाने टप्प्याटप्प्याने बडोदा बॅंकेच्या पिंपरी शाखेत गुणवंत विद्यार्थ्यांची यादी दिली. त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, २५० विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये दोनदा पाठविण्यात आले. ती एकूण रक्कम तब्बल २५ लाख इतकी आहे. बॅंक खात्यावर २० हजार रुपये जमा झाल्याचे पाहून विद्यार्थी व पालक खुश झाले. यंदा बक्षिसाची रक्कम वाढवल्याने इतकी रक्कम मिळाल्याचा त्यांचा समज झाला. ही बाब समजल्यानंतर समाज विकास विभागाला खडबडून जागा झाला.

हेही वाचा >>> पुणे : पंचतारांकित हॉटेलमध्ये साडेपाच लाखाची दारू पिऊन काढला पळ; अशी केली फसवणूक

रक्कम परत मिळविण्यासाठी समाज विकास विभागातील लिपिक व कर्मचाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना मोबाइलवर संदेश पाठवत जास्तीची रक्कम परत पाठविण्याची विनंती केली. काही विद्यार्थ्यांना फोन करून रक्कम परत करण्यास सांगण्यात आले. त्याला काही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे. तर काही विद्यार्थी प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित लिपिकांची अडचण झाली आहे. लिपिकाने विद्यार्थ्यांची यादी दोन वेळा बॅंकेत जमा केल्याने हा प्रकार घडला.

लिपिकाच्या वेतनातून रक्कम वसूल करणार

सर्व २५० विद्यार्थ्यांनी प्रत्येक दहा हजारांची रक्कम पुन्हा महापालिकेकडे जमा करणे आवश्‍यक आहे. मात्र, तसे न झाल्यास पालिकेस आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ही रक्कम संबंधित लिपिक व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात डिसेंबर महिन्यात २५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले होते. त्यानंतर मार्चमध्ये ६०० विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करताना लाभ मिळालेल्या २५० विद्यार्थ्यांची  यादीही बँकेत दिली गेली. त्यामुळे दोनवेळा खात्यावर पैसे गेले. आतापर्यंत १०७ विद्यार्थ्यांनी पैसे परत केले आहेत. याप्रकरणी या योजनेचे लिपीक आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. -अजय चारठणकर, उपायुक्त समाज विकास विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Strange administration of pimpri municipal corporation prize money was given twice to the students pune print news ggy 03 ysh

First published on: 02-06-2023 at 11:52 IST
Next Story
पुणे : पंचतारांकित हॉटेलमध्ये साडेपाच लाखाची दारू पिऊन काढला पळ; अशी केली फसवणूक