शेतकऱ्यांकडून बांधावर स्ट्रॉबेरी फेकून देण्याचे प्रकार 

पुणे, वाई : डिसेंबर महिन्यात लालचुटूक स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरात येतो. नाताळ सणात देशभरातून वाई, सातारा, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला मागणी वाढते. मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे ऐन हंगामात स्ट्रॉबेरीला फटका बसला असून शेतकऱ्यांनी खराब स्ट्रॉबेरी बांधावर फेकून दिल्याचे प्रकार महाबळेश्वर, पाचगणी भागात घडले.  यंदा स्ट्रॉबेरीच्या हंगामावर परिणाम झाला असून शेतकरी तसेच फळबाजारातील व्यापारी संकटात आले आहेत.   

 गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तसेच दाट धुक्यामुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले. महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी अक्षरश: स्ट्रॉबेरी बांधावर फेकून दिली. पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या प्रतवारीवर परिणाम झाला. स्ट्रॉबेरीची रोपे नाजूक असतात. पावसाच्या तडाख्यामुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले. डिसेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू होते. स्ट्रॉबेरीचा पहिला बहर पूर्णपणे वाया गेला असून नाताळात स्ट्रॉबेरीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.  

गेल्या काही वर्षांपासून स्ट्रॉबेरीला प्रक्रिया उत्पादकांकडून मागणी वाढत आहे. आइस्क्रीम, चॉकलेट, जाम तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर केला जात आहे. स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने प्रक्रिया उद्योगांकडून असणारी मागणी कमी झाली आहे.  सध्या बाजारात एक किलो स्ट्रॉबेरीला प्रतवारीनुसार १०० ते ३०० रुपये दर मिळत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत स्ट्रॉबेरीला मिळणारे दर अपेक्षेएवढे नाहीत. बाजारात आवक होणाऱ्या स्ट्रॉबेरीची प्रतवारीही फारशी चांगली नाही.

महाबळेश्वर, पांचगणी भागातील शेतकरी स्ट्रॉबेरी पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात विक्रीस पाठवितात. नवी मुंबईतील घाऊक बाजाराच्या तुलनेत पुण्यातील फळबाजार जवळ असल्याने शेतकरी मार्केट यार्डातील बाजारात स्ट्रॉबेरी विक्रीस प्राधान्य देतात. दरवर्षी स्ट्रॉबेरीचा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यात विक्रीस पाठविण्यात येणाऱ्या स्ट्रॉबेरीची प्रत उत्तम मानली जाते. नाताळात देशभरातून मागणी वाढते. पुण्यातील बाजारातून विमानाने दिल्ली, बंगळुरु, गोवा, हैदराबाद येथे स्ट्रॉबेरी विमानाने विक्रीस पाठविली जाते.

डिसेंबर महिन्यात दररोज दहा टन स्ट्रॉबेरीची आवक बाजारात होते. मात्र, अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी खराब झाली असून अपेक्षेएवढे दर मिळत नसल्याने शेतकरी तसेच व्यापारीही संकटात आले आहेत, असे  मार्केट यार्डातील स्ट्रॉबेरी व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.

नुकसान भरपाईसाठी प्रयत्न

स्ट्रॉबेरीचे नुकसान झाल्यामुळे कृषी विभागाशी संपर्क साधला असून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणे योग्य ठरणार नाही. नुकसान भरपाईसाठी प्रयत्नशील असल्याचे सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजापुरे यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला आहे. स्ट्रॉबेरी नाजूक फळ असून ते नाशवंत आहे. खराब झालेली स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांनी टाकून दिली. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

 राजेंद्र कासुर्डे, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, पांचगणी, जि. सातारा