पुणे : डीपी रस्ता परिसरात कुत्रा चावलेले तीन रुग्ण एकामागून एक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले. एकाच ठिकाणी कुत्रा चावल्याच्या घटना घडल्याने डॉक्टरांनी जागरूकता दाखवत तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेच्या यंत्रणांनी तत्परता दाखवत या कुत्र्याला जेरबंद केले. नंतर हा कुत्रा लक्षणांवरून रेबीजग्रस्त असल्याचे प्रथमदर्शनी निर्दशनास आले. त्यामुळे कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांवर लगेचच प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आल्याने त्यांच्या जिवाला असलेला धोका टळला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अचानक एकामागोमाग तीन रुग्ण कुत्रा चावल्यामुळे उपचारासाठी दाखल झाले. रुग्णांकडून माहिती घेतली असता, डीपी रस्त्यावर एकाच ठिकाणी या तिघांनाही कुत्रा चावल्याचे स्पष्ट झाले. यातील गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षातील डॉ. ज्योत्स्ना भोसले यांनी तातडीने अलंकार पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून याबाबत माहिती दिली. त्याची दखल घेऊन पोलीस कॉन्स्टेबल तुषार साळुंखे यांनी वरिष्ठांना कळविले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या श्वानपथकाने तत्परता दाखवत डीपी रस्ता परिसरात त्या कुत्र्याचा शोध सुरू केला. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर महालक्ष्मी लॉन परिसरात त्याला पकडण्यात यश आले. त्या वेळी परिसरात केलेल्या चौकशीत तो कुत्रा एकूण पाच जणांना चावला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा कुत्रा चावलेल्या रुग्णांवर तातडीने रेबीज प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले. हा कुत्रा लक्षणांवरून रेबीजग्रस्त असल्याचे निर्दशनास आले. श्वान पथकाने पकडल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्या परिसरातील इतर कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
रेबीज ठरतोय जीवघेणा
जगभरातील १५० देशांमध्ये रेबीज ही सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या आहे. रेबीजमुळे वर्षाला जगभरात ५९ हजार मृत्यू होतात, तर रेबीज प्रतिबंधात्मक लस वर्षाला सरासरी २ कोटी ९० लाख जणांना घ्यावी लागते. कुत्र्याने चावा घेतल्याने अथवा ओरखडल्याने मानवामध्ये रेबीज संसर्गाची ९९ टक्के प्रकरणे दिसून येतात. कुत्रा चावल्यानंतर वेळीच रेबीज प्रतिबंधात्मक उपचार घेतल्यास जिवाचा धोका टळतो. मात्र, हे उपचार न घेतल्यास रेबीजसंसर्ग रुग्णाच्या मध्यवर्ती चेतासंस्थेपर्यंत पोहोचतो. त्या वेळी रुग्णामध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागतात. त्यानंतर कोणत्याही औषधोपचाराने रुग्णाला वाचविणे शक्य होत नाही.
