पुणे : भटक्या श्वानांचे लसीकरण, नसबंदी आणि अचूक नोंदी ठेवण्यासाठी आतापर्यंत दीड हजार श्वानांना मायक्रोचिप बसविण्यात आली असून, पुणे शहराला २०३० पर्यंत रेबीजमुक्त करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. मायक्रोचिपमुळे प्रत्येक श्वानाची ओळख, लसीकरणाचा इतिहास आणि पुढील उपचारांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येत असल्याची माहिती महापालिकेच्या प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे-भोसले यांनी दिली.

शहरात जवळपास निम्म्या भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण झाले असून, येत्या दोन वर्षांत उर्वरित लसीकरण पूर्ण करण्याचा महापालिका पशुवैद्यकीय विभागाचा मानस आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावे समाविष्ट झाल्याने भटक्या श्वानांची संख्या अडीच लाखांवर गेली आहे. गेल्या तीन वर्षांपासून लसीकरण उपक्रम हाती घेतला असून, अद्याप अपुऱ्या मनुष्यबळामुळे निम्मेच लसीकरण झाले आहे. पूर्वी नसबंदी झालेल्या श्वानांची ओळख पटावी, म्हणून त्यांच्या कानाचा कोपरा कापण्याची पद्धत वापरली जात होती. मात्र, मायक्रोचिपमुळे ही पद्धत जवळपास कालबाह्य ठरत आहे. स्कॅनरच्या साहाय्याने १५ ते २० सेंटीमीटर अंतरावरून चिप वाचता येत असल्याने संबंधित श्वानाचे लसीकरण, नसबंदी आणि इतर तपशील काही क्षणांत उपलब्ध होतात.

या संदर्भात डॉ. सारिका फुंडे-भोसले म्हणाल्या, ‘मायक्रोचिपमुळे प्रत्येक श्वानाचे ट्रॅकिंग आणि वैद्यकीय नोंदी जतन करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचे नियोजन अचूक करता येते आणि श्वानांवरील अनावश्यक मानवी हस्तक्षेपही कमी होतो. रेबीजमुक्त पुण्याच्या उद्दिष्टासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे.’

पालखी मार्गावरील श्वानांचा बंदोबस्त

आषाढी वारी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेच्या श्वान बंदोबस्त पथकाने पालखी मार्गावरील २५ भटके श्वान तात्पुरते पकडून निरीक्षणाखाली ठेवले आहेत. पालखी मार्ग मोकळा झाल्यानंतर या श्वानांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

जर श्वानाने कोणावर हल्ला केला, तर त्या श्वानाचा इतिहास, लसीकरण या सर्वांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी मायक्रोचिप गरजेची आहे. या उपक्रमात महापालिकेचे १९ पशुवैद्यकीय डॉक्टर सहभागी आहेत. वर्षभरात ८० हजार ते एक लाख श्वानांना मायक्रोचिप बसवण्याचा मानस आहे, असे युनिव्हर्सल एनिमल वेल्फेअरच्या सहसंस्थापक डॉ. स्वाती शेळके यांनी सांगितले.

लसीकरणाचा तपशील

वर्ष – लसीकरण केलेली श्वानसंख्या
२०२४-२५ : ६५ हजार ५३७
२०२५-२६ : ६१ हजार ४५४
२०२६ जाने ते जून : १२ हजार २९०
एकूण : १,३९,२८१