पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर शहर शिवसेनेत उद्वव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून रस्त्यावर जोरदार प्रदर्शन सुरू असतानाच ही लढाई आता व्हाॅटसॲप ग्रुपपर्यंत पोहोचली आहे. शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले आणि सामंत यांचे निकटवर्तीय युवा सेना सचिव किरण साळी यांनी शिवसेना उपनेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांना व्हाॅटस्ॲप ग्रुपमधून वगळले आहे. त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली असून येत्या काही दिवसांत या दोन गटातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या उपक्रमांची, कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी शिवेसना-युवा सेना पत्रकार मित्र असा व्हाॅटसॲप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये अनेक पत्रकार, शिवसेनेचे पदाधिकारी, मोठे नेते, कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या ग्रुपवरून शिवसेनेचे अनेक नेते विचार मांडत असतात. डाॅ. नीलम गोऱ्हे याही अनेक राजकीय, सामाजिक विषयांवर सातत्याने मते मांडत होत्या. मात्र सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर या ग्रुपमधून गोऱ्हे यांना वगळण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकात सभा झाल्यानंतर कात्रज चौकातून निघालेल्या उदय सामंत यांच्या गाडीवर ठाकरे समर्थकांनी हल्ला केला होता. त्याचे पडसादही उमटले होते. त्यामुळेच किरण साळी यांनी डाॅ. नीलम गोऱ्हे यांना तातडीने ग्रुपमधून वगळले. किरण साळी यांची राजकीय कारकीर्द डाॅ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. किरण साळी नीलम गोऱ्हे यांचे अत्यंत विश्वासू असल्याची चर्चा होती. गुरू-शिष्य अशीच राजकीय वर्तुळात या दोघांची ओळख होती. मात्र शिष्याने गोऱ्हे यांना ग्रुपमधून काढून टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील तणाव वाढल्यामुळे किरण साळी यांनी ही कृती केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर साळी यांनी युवा सेनेच्या सहसचिव पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी व्हाॅटसॲप ग्रुपचे नाव आणि डीपीही बदलला होता. त्याची चर्चाही रंगली होती.

सन २०१८ मध्ये शिवसेना युवा सेवा या व्हाॅटस्ॲप ग्रुप निर्माण करण्यात आला. शिवसेनेची ध्येय धोरण, मंत्र्यांचे दौरे, विकासकामे, निमंत्रणे या माध्मयातून दिली जात होती. शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी ग्रुपमध्ये घेण्यात आले. मात्र सत्ताबदलानंतर डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून खोटी माहिती देण्यास सुरुवात झाली. एक माजी नगरसेवकाच्या पक्ष प्रवेशावेळीही त्यांनी चुकीची माहिती पसरवली. सामंत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर शिवसैनिकांनी हल्ला केला नाही, असे गोऱ्हे यांनी जाहीर केले. वास्तविक शिवसैनिकांनीच हल्ला केला हे स्पष्ट झाले होते. आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या व्यासपीठावर असतानाही त्यांनी खोटी माहिती दिली. खोटी माहिती पसरवली जाऊ नये, यासाठीच ग्रुपमधून त्यांना काढण्यात आले, असे किरण साळी यांनी सांगितले. आमच्या वैचारिक वाद नाहीत. राजकीय मतभेद आहेत. त्या आजही माझ्या नेत्या आहेत, असेही साळी यांनी नमूद केले.