थकित रक्कम मिळावी या मागणीसाठी पीएमपीला गाड्या पुरविणाऱ्या ठेकेदारांनी सुरू केलेला संप मागे घेतला. पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सेवा पूर्ववत सुरू झाल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीच्या दररोज १ हजार ५०० गाड्या धावतात. पीएमपीने गेल्या काही महिन्यांपासून थकबाकी दिलेली नाही. त्यामुळे थकबाकीची रक्कम तातडीने न दिल्यास सेवा बंद करण्यात येईल, असे पत्र ठेकेदारांकडून पीएमपी प्रशानसाला देण्यात आले होते. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांपैकी निम्म्या गाड्या ठेकेदारांच्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासूनची रक्कम मिळाली नसल्याचा दावा करत दैनंदिन संचलनातील सातशेहून अधिक गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.

पुरवठादार ठेकेदारांनी अचानक संप पुकरल्याने पीएमपी सेवेवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांचे हाल झाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरीचे आयुक्त राजेश पाटील तसेच पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या समवेत चर्चा केली. दोन्ही महापालिका आयुक्तांनी पीएमपीला तुटीची रक्कम दिल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने थकबाकी दिली जाईल असे मिश्रा यांनी सांगितले आणि संपातील सहभागी ठेकेदारांबरोबर बैठक घेऊन तसे आश्वासन दिले. त्यानंतर संप मागे घेतल्याचे ठेकेदारांनी जाहीर केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संचलन तूट पीएमपीला देण्यात येते. त्यातून विविध रक्कम अदा केली जाते.  ठेकेदारांना थकीत ९९ कोटी ९३ लाख १४ हजार २४९ रुपये देणे आहे. यापैकी काही दिवसांपूर्वी ६६ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले होते.