गणेशोत्सव महिनाभरावर असल्यामुळे राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आलाय. या कामात कारागिरच नव्हे तर पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थीही मग्न आहेत. गुरुकुलम या आश्रम शाळेतील विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे सुरेख मूर्ती तयार करण्यात व्यग्र आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून याठिकाणी बाप्पांची सुरेख मूर्ती विदयार्थ्यांकडून साकारण्यात येते.  विशेष म्हणजे एक विद्यार्थी किमान शंभर ते दीडशे मूर्ती तयार करतो. त्यामुळं बाप्पांची मूर्ती तयार करण्याच्या त्यांची कुशलता ही कौतुकास्पद अशीच आहे. मूर्तींसह सुरेख पणत्या देखील याठिकाणी तयार करण्यात येतात.

दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर अनेक वेळा विद्यार्थी खचून जातात, परंतू गुरुकुलमचे विद्यार्थी आपल्यातील कला कौशल्याच्या जोरावर अपयशानंतर यश शोधण्याचा प्रयत्न करताना दिसते. गुरुकुलममधील अमर हा गणेश मूर्ती साकारण्यात पारंगत आहे. तो मूळचा बुलढाण्याच्या असून कथेत ऐकलेला बाप्पा तो मूर्तीच्या रुपातून साकरण्याचे कला जोपासतोय. पिंपरी चिंचवडच्या गुरुकुलममध्ये आल्यानंतर त्याला हे भाग्य मिळाले. त्याच्यासाठी गुरुकुलम कलेची पंढरी असल्याचे तो सांगतो. अमरप्रमाणेच अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थींनी देखील गुरुकुलममध्ये कला अवगत करण्यासाठी मेहनत घेताना दिसते. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कोणी आईच्या प्रेमाला मुकलाय तर कोणी वडिलांच्या छत्रछाया हरवलाय. पण बाप्पाला साकारताना आपले सर्व दु:ख ही मंडळी विसरुन जातात.

बालपण मातीत खेळून घालवण्यापेक्षा या मातीतून मूर्ती साकारुन सर्व विद्यार्थी एक आदर्श निर्माण करत आहेत. गुरुकुलममध्ये प्रवेश घेतल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमत नाही, त्यांना मूर्ती कलेचे धडे देण्यास प्राधान्य दिले जाते. मूर्ती साकारताना त्यांची एकाग्रता वाढते, त्यानंतर या विद्यार्थ्यांची अभ्यासातही प्रगती होते. एकंदरीत ज्ञानासह व्यावसायिक शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार दिला जातो.