पुणे : वाघोली भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून रात्री प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्राध्यापकासह विद्यार्थ्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी सात जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रा. प्रतीक किसन सातव यांच्यासह आदित्य यशवंत खिलारे, अमोल अशोक नागरगोजे, अनिकेत शिवाजी रोडे अशी पोलीस कोठडीत रवानगी केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई शेखर काटे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रतीक सातव हे सोमवारी (२ जून) दुपारी झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षातील बीजगणिताची (मॅथेमॅटिक्स २) प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून रात्री सोडवून घेणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. प्रा. सातव यांनी त्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली. त्या वेळी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षातील आठ विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने उत्तरपत्रिका ठेवलेल्या कक्षाची किल्ली त्यांच्याकडून जप्त केली. विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतलेल्या उत्तरपत्रिकांची सहा बंडले, तसेच प्रा. सातव आणि साथीदारांकडून दोन लाख सहा हजार रुपये जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले.
किती विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले?
प्रा. सातव यांनी किती विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले, तसेच अशा प्रकारे त्यांनी किती विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या, सातव यांनी कोडिंग केलेल्या प्रश्नपत्रिका मिळविल्या कशा, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. तपासासाठी प्रा. सातव यांच्यासह विद्यार्थ्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी केली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. प्रा. सातव यांच्या घराची झडती घ्यायची आहे, असे सरकारी वकील नितीन अडागळे यांनी युक्तिवादात सांगितले. बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे युक्तिवादात सांगितले. प्रा. सातव यांच्यासह चौघांना सात जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले.