कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वर्गात विद्यार्थी येत नसतील, तर त्या महाविद्यालयांना शिक्षक भरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे. याबाबत विभागीय कार्यालयांनी परिपत्रकेही काढली आहेत.
अकरावी, बारावीच्या वर्गात विद्यार्थिसंख्या मोठी दिसते. प्रत्यक्षात वर्गात विद्यार्थीच दिसत नाहीत. विद्यार्थी वेगवेगळ्या शिकवण्यांना जात असल्यामुळे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिसंख्या कमी असल्याची तक्रार सातत्याने विविध घटकांकडून करण्यात येते. एकीकडे वर्गात विद्यार्थी दिसत नाहीत आणि त्याचवेळी शिक्षक पदांसाठी महाविद्यालयांकडून मंजुरी मागण्यात येते. मग विद्यार्थीच नसतील तर शिक्षक तरी काय करायचेत, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे. त्या पाश्र्वभूमीवर ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वर्गात बसत नाहीत, त्या महाविद्यालयाची पटसंख्या कितीही दिसत असली, तरी नव्याने शिक्षक पदे मंजूर करू नयेत, असे परिपत्रकच शिक्षण विभागाने काढले आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या या परिपत्रकात शिक्षण आयुक्तांनी सूचना दिल्याचा संदर्भ देण्यात आला आहे. शिक्षण आयुक्तांच्या समितीने ठरवल्याप्रमाणे महाविद्यालयांची तपासणी करून ज्या महाविद्यालयांत वर्गात विद्यार्थी असतील, त्यांनाच शिक्षक भरतीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल अशा आशयाचे हे परिपत्रक आहे. त्यानुसार कार्यालयाने समित्या नेमून महाविद्यालयांची तपासणी करण्याची तयारी देखील सुरू केली आहे.

 महाविद्यालयांत विद्यार्थी येत नाहीत. असे असताना मंजूर झालेल्या शिक्षक पदांचा शासनावरच भार येतो. त्यामुळे आयुक्तांनी विद्यार्थिसंख्येची पाहणी करून शिक्षक पदांच्या भरतीला ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाविद्यालयांची तपासणी करून जेथे विद्यार्थी असतील, तेथेच शिक्षक मान्य केले जाणार आहेत.
– रामचंद्र जाधव, विभागीय शिक्षण उपसंचालक