scorecardresearch

सततच्या उपक्रमांचा विद्यार्थी, शिक्षकांवर भडिमार; शिक्षण क्षेत्रात नाराजीचा सूर

विविध उपक्रमांतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन साजरा केल्यानंतर आता २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सद्भावना ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत.

सततच्या उपक्रमांचा विद्यार्थी, शिक्षकांवर भडिमार; शिक्षण क्षेत्रात नाराजीचा सूर
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : विविध उपक्रमांतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन साजरा केल्यानंतर आता २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सद्भावना ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. या सततच्या शासकीय उपक्रमांच्या भडिमारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचा अधिक वेळ उपक्रमांमध्येच जात असून, विद्यार्थ्यांनी शिकायचे कधी आणि शिक्षकांनी शिकवायचे कधी असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे.

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शाळांमध्ये असे उपक्रम राबवण्यात आले. तसेच यंदा फाळणी दु:खद स्मृतिदिनासारख्या उपक्रमाचीही भर पडली होती. आता अल्पसंख्याक विभागाकडून २० ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस, तर २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत सद्भावना ऐक्य पंधरावडा साजरा करण्याच्या सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार २० ऑगस्टला सद्भावना शर्यत, प्रतिज्ञा, सर्वधर्म प्रार्थना आदी उपक्रम, २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीतही वक्तृत्त्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा आदी उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना  उपक्रमांमध्येच जाणार असल्याचे दिसून येत आहे.

अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी सांगितले, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धामधून बाहेर येऊन शिकणे-शिकवणे सुरू  होत असताना आता सद्भावना पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना पुन्हा सहशालेय उपक्रम राबवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण ही प्राथमिक गरज असताना उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी शिकायचे कधी, शिक्षकांनी शिकवायचे कधी असा प्रश्न आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यापासून शिक्षकांचा अधिक वेळ  शिक्षणेतर कामांमध्येच खर्च झाला आहे. 

शासकीय शाळा उपक्रमांची प्रयोगशाळा?

खासगी इंग्रजी-मराठी शाळांना सरकारी उपक्रमांची सक्ती केली जात नाही. त्यामुळे शासकीय शाळांना सरकारी उपक्रमांची प्रयोगशाळा का केली जात आहे, असा सवालही शिक्षण क्षेत्रातून विचारण्यात येत आहे.

शिक्षकांचा अन्य वेळ शासकीय उपक्रम आणि अन्य कामांमध्येच जातो. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. काही शिक्षक शासकीय कामांसाठी शाळेबाहेर असल्याने वर्ग होत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शाळा आणि शिक्षकांबाबत नकारात्मकता निर्माण होत आहे.  पूर्ण दिवसभर शिकणे आणि शिकवणे असा आठवडाभराचा उपक्रम राबवण्याची वेळ आली आहे. अध्ययन-अध्यापनाविषयी गांभीर्याने विचार करायला हवा आहे.

– अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students teachers continuous activities displeasure education sector ysh

ताज्या बातम्या