मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल, सोलापूर विद्यापीठ नामांतर वाद सुरु असतानाच राज्यातील आणखीन एक मोठी शैक्षणिक संस्था वादात सापडण्याची शक्यता आहे. केवळ शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थ्यांनाच विद्यापीठामार्फत ‘योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ दिले जाईल असे पत्रकच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शेलारमामा सुवर्णपदकासाठीच्या अटींची यादीचे पत्रक प्रसिद्ध कऱण्यात आले असून, त्यात ही अजब अट घालण्यात आली आहे.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये दरवर्षी ‘योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ देण्यात येते. विज्ञान विद्याशाखा आणि विज्ञानेतर विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या पदकासाठी अर्ज करु शकतात. दरवर्षी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंबंधी पत्रक प्रसिद्ध करण्यात येते. मात्र यंदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकांमध्ये अटींची मोठी यादीच देण्यात आली आहे. विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थीच या पदकासाठी पात्र असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले असून १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी या सुर्वणपदकासाठीचे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवणे बंधनकारक आहे.

 

संकेतस्थळावरील पत्रकाप्रमाणे अटींमधील यादीतील सातव्या क्रमांकाची अट सर्वात चमत्कारी आहे. सातव्या अटीप्रमाणे अर्ज करणारा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा, अशी अट या पत्रकात आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणारा विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असावा, त्या विद्यार्थ्याने भारतीय आणि परदेशी क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवलेली असावीत. रक्तदान, श्रमदान, पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रण कार्य, साक्षरता आणि स्वच्छता मोहीम तसेच एड्स रोगाविरुद्ध जनजागरण मोहिमेमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग असावा, अशीही अट घालण्यात आली आहे. हे कमी म्हणून की काय योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या पुरस्कारासाठी प्राध्यान्याने विचार केला जाईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अटींची यादी खूपच मोठी आहे. वरील अटींशिवाय अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार, विचार, परंपरांचे जतन करणारा तर असावाच. पण त्याने गायन नृत्य, वक्तृत्व, नाट्य आणि इतर कलांमध्ये नैपुण्य मिळवलेले असावे, अशीही अट या पत्रकात आहे.

दरम्यान, अशी अट घालण्यामागचे कारण काय, या संदर्भात विद्यापीठाकडून माहिती मिळू शकलेली नाही.