पुणे : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या (डीव्हीईटी) दोन वर्षे कालावधीच्या २३ पदविका अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सअंतर्गत (टिस) व्यवसाय पदवी अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना टाटा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे.
मंडळाने संलग्नता दिलेल्या १ हजार २६५ संस्थांमध्ये काही तासांपासून, सहा महिने, एक वर्ष, दोन वर्ष कालावधीचे अर्धवेळ आणि पूर्णवेळ असे ३६५ पदविका, प्रगत पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. मंडळाच्या अभ्यासक्रमांची प्रवेश पात्रता ही केवळ साक्षर (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) ते पदव्युत्तर (प्रगत पदविका अभ्यासक्रम) आहे. अभ्यासक्रमांचा मूळ उद्देश युवक-युवतींना स्वयंरोजगारक्षम करण्याचा आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणाच्या स्तराची समकक्षता निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.




हेही वाचा >>>पिंपरी: निगडीत मनोरुग्ण तरुणीवर अत्याचार; आरोपी अटकेत
या पार्श्वभूमीवर टाटा इन्स्टिट्यूट मंडळाचे दोन वर्षे कालावधीच्या २३ पदविका अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय पदवी अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी पात्र केले आहे. संस्थेच्या व्यवसाय पदवी अभ्यासक्रमांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेची माहिती https://msbsvet.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी सांगितले.