पुणे : हिंदी महासागरात उष्णतेच्या लाटा जवळपास कायमस्वरूपी येत राहण्याची शक्यता नव्या अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे. सध्याच्याच वेगाने उत्सर्जन सुरू राहिल्यास हिंदी महासागराचे तापमान चालू शतकाच्या अखेरीत ते आणखी वाढण्याचा अंदाज नव्या प्रारुपाद्वारे वर्तवण्यात आला आहे. परिणामी महासागराच्या आजुबाजूचा प्रदेश आणि सागरी परिसंस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी कोल यांच्या नेतृत्त्वाखाली विविध देशांतील संशोधन संस्था, विद्यापीठांतील शास्त्रज्ञांचा सहभाग होता. हे संशोधन एल्सवियरमध्ये प्रकाशित झाले. हिंदी महासागराच्या प्रदेशात ४० देशांमध्ये जगाच्या एक तृतीयांश लोकसंख्या राहते. आजवर दर शतकात १.२ अंश सेल्सियस या वेगाने वाढणारे हिंदी महासागराचे तापमान चालू शतकाच्या अखेरीपर्यंत ३.८ अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे महासागरातील वाढत्या उष्णतेचा, उष्णतेच्या लाटांचा परिणाम या प्रदेशावरही होऊ शकतो. विशेष म्हणजे हिंदी महासागराचे वाढणारे तापमान केवळ पृष्ठभागावर नसून दोन हजार मीटर खोलीपर्यंत आहे. सध्या दर दशकात ४.५ झेट्टाजेल या वेगाने वाढत आहे. भविष्यात दर दशकात १६ ते २२ झेट्टाजेल वेगाने वाढण्याची शक्यता आहे. २१ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत महासागराचे तापमान २८ अंश सेल्सियसवर जाऊ शकते. त्यामुळे अतिपाऊस आणि चक्रीवादळांची स्थिती निर्माण होऊ शकते.

हेही वाचा…लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात अद्भूत ‘किरणोत्सव’! स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा अनोखा मिलाफ

गेल्या काही वर्षांत हिंदी महासागरातील उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, येत्या काळात महासागरात उष्णतेच्या लाटा कायमस्वरुपी राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटांचे प्रमाण सध्याच्या वीस दिवसांवरून २०५० पर्यंत २२० ते २५० दिवसांपर्यंत जाऊ शकते. उष्णतेच्या लाटांमध्ये होणारी वाढ सागरी परिसंस्थेसाठी हानीकारक ठरू शकते. तसेच मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

महासागरात होत असलेले बदल ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या बदलांचा परिणाम पुढील पिढ्यांवर होईल असे नाही, तर सध्याच्या पिढीवरही होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. हिंदी महासागरातील परिसंस्था आणि भावी पिढ्यांच्या रक्षणासाठी आताच निर्णायक पावले टाकणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. रॉक्सी कोल नमूद केले.

हेही वाचा…काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! ‘चारधाम’साठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

वाढते आम्लीकरण, समुद्र पातळीत वाढ

उष्णतेच्या लाटा कायमस्वरुपी होण्यासह महासागराचे आम्लीकरण वाढत आहे. त्यामुळे महासागरातील प्रवाळ, समुद्री गवत अशा जैवविविधतेला फटका बसू शकतो. काही प्रजाती नामशेष होऊ शकतात. तसेच महासागराची उष्णता वाढल्याने समुद्राच्या पातळीत वाढ होऊ शकते. पाण्याचे प्रसरण होऊन हिंदी महासागरातील पाण्याची पातळी निम्म्यापेक्षा जास्त वाढू शकते. ग्लेशियर आणि समुद्री बर्फ वितळून वाढणाऱ्या पातळीपेक्षाही हे प्रमाण जास्त आहे.