अभ्यासिका शाळेतून हद्दपार

दर तीन महिन्यांनी परवानगीचे नूतनीकरण करण्यात येत होते.

(संग्रहित छायाचित्र)

महापालिकेच्या अनास्थेमुळे सेवाभावी संस्थेपुढे अडचणी

शहरातील मोकळ्या जागा, सार्वजनिक जागा, महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या, मैदाने आणि अन्य मिळकतींचा दांडगाईने सर्रास वापर करण्यात येत असतात. अशा गैरकृत्यांवर कारवाई करण्याऐवजी या प्रकारांना अभय देणाऱ्या महापालिका प्रशासनाने नियमांवर बोट ठेवत १२ वर्षांपासून महर्षिनगर परिसरात सुरू असलेल्या एका संस्थेच्या अभ्यासिकेचे वर्ग बंद केले आहेत.

विशेष बाब म्हणून या संस्थेला अभ्यासिका चालविण्यासाठी मान्यता देण्यात आल्यानंतरही परवानगीसाठी टाळाटाळ सुरू असून ही अभ्यासिका महापालिकेच्या एका उद्यानात भरवण्याची वेळ संस्थाचालकांवर आली आहे.

मार्केट यार्ड परिसरातील पाच वस्त्यांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या हेतूने सन २००६ पासून बालशिक्षण मंच संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अभ्यासिका चालवली जात आहे. महापालिकेचे शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना महर्षिनगर येथील संत ज्ञानदेव शाळेत हे वर्ग सुरू झाले.

अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसल्यामुळे या संस्थेला वर्गखोली विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती. दर तीन महिन्यांनी परवानगीचे नूतनीकरण करण्यात येत होते. मात्र मंडळ बरखास्त झाल्यानंतर नियमांचा आधार घेत या संस्थेला वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यास महापालिका प्रशासनाकडून नकार देण्यात आला आहे.

महापालिका आयुक्तांच्या परिपत्रकाचा आधार घेत परवानगी असल्याशिवाय वर्गखोली उपलब्ध करून देता येणार नाही, असे संस्थेचे अध्यक्ष अमर पोळ यांना सांगण्यात आले. त्यामुळे रीतसर परवानगी घेण्यासाठी पोळ यांनी शिक्षण विभागातील अधिकारी दीपक माळी यांच्याशी संपर्क साधला. संस्थेचे कार्य आणि अभ्यासिकेला मिळत असलेल्या प्रतिसादाची माहिती दिल्यानंतर विशेष बाब म्हणून या संस्थेला वर्ग चालविण्यास मान्यता देण्यात येईल, अशी शिफारस शिक्षण विभागाकडून करण्यात आली. मात्र त्यानंतर केवळ टोलवाटोलवी करण्यात आली आणि उर्मट उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच वर्गखोलीही बंद करण्यात आली. दहा हजार रुपये मासिक भाडे आणि पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम दिल्याशिवाय वर्गखोली देता येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. या संदर्भात पोळ यांनी अतिरिक्त आयुक्तांपासून थेट आयुक्त पातळीपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. मात्र पैसे भरता येत नसतील तर वर्ग बंद करा, असे त्यांना सांगण्यात आले.

दरम्यान, स्थानिक नगरसेविका राजश्री शिळीमकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्यांनी परिसरातील दुसऱ्या शाळेची वर्गखोली संस्थेला देण्यात यावी, अशी सूचना केली. त्यानुसार संत नामदेव शाळेत आठ दिवस वर्ग सुरू झाले, पण पुन्हा नियमांवर बोट ठेवत तेथेही परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मैदानावर अभ्यासिका सुरू करण्यात आली. पण पाऊस आणि अन्य अडचणींमुळे ती सध्या महर्षिनगर परिसरातील अरुणा असफअली उद्यानात स्थलांतरित करण्यात आली आहे. मात्र अंधारामुळे अभ्यासिकेपुढील अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, स्थानिक नगरसेविका राजश्री शिळीमकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्यांनी परिसरातील दुसऱ्या शाळेची वर्गखोली संस्थेला देण्यात यावी, अशी सूचना केली. त्यानुसार संत नामदेव शाळेत आठ दिवस वर्ग सुरू झाले, पण पुन्हा नियमांवर बोट ठेवत तेथेही परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मैदानावर अभ्यासिका सुरू करण्यात आली.

कार्य लक्षात घ्या

वस्ती परिसरातील महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे ८० टक्के विद्यार्थी अभ्यासिकेत असून २० टक्के विद्यार्थी खासगी शाळेत जाणारे आहेत. ही अभ्यासिका विनामूल्य चालविली जाते. संस्थेला आवश्यक तेवढी मदत दानशूर लोकांकडून मिळते. संस्थेचे कार्य लक्षात घेऊन वर्गखोल्या विनामूल्य उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली होती, असे अध्यक्ष अमर पोळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Study room exile from the school