अभ्यास सहलींमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात आणि आयुर्विमा उतरवण्याची जबाबदारी आता शिक्षणसंस्थांची राहणार आहे. त्याचप्रमाणे सहलींमध्ये सहभागी होण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही पालकांचे लेखी परवानगीपत्र लागणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याबाबत महाविद्यालये आणि विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत.
विद्यापीठे, महाविद्यालये विविध अभ्यास सहली, उद्योगांना भेटी अशा उपक्रमांचे आयोजन करत असतात. या सहलींदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे शिक्षणसंस्थांची राहणार आहे. शिक्षणसंस्थेचे प्राचार्य किंवा संचालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असणार आहेत. या सहलींदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परिषदेने आणि आयोगाने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार आता सहलींदरम्यान विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्याही अपघात आणि आयुर्विम्याची जबाबदारी शिक्षणसंस्थांनी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आता सहलीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे लेखी परवानगीपत्र आणि शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्रही द्यावे लागणार आहे.
याशिवाय सहलीबरोबर किमान एक शिक्षक असावा. विद्यार्थिनी असतील तर शिक्षिका असावी. वीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गट असल्यास स्थानिक माहीतगार बरोबर असावा. हवामान आणि परिस्थितीचा अंदाज घेऊनच सहलींचे आयोजन करावे. पोहोणे, नौकाविहार यासारखे खेळ प्रशिक्षित जीवरक्षकांच्या देखरेखीखाली करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.