पुणे : प्रेमसंबंधातून विवाह केल्यानंतर तरुणीकडे हुंड्यापोटी ४० लाखांची मागणी, सदनिका, मोटार खरेदीसाठी पैसे देण्याची मागणी करून प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने तिचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षकाविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ करून त्याने पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा आराेप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत एका तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीची स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर विवाहाचे आश्वासन दिले. तसेच, त्याने संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
उपनिरीक्षक पतीचा अभ्यासासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी तरुणीने दोन लाख ४० हजार रुपयांची मदतही केली होती. १ ऑगस्ट २०२४ रोजी उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर त्याच्या वागण्यात बदल झाला. त्याने विवाहास नकार दिल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये दोघांनी आळंदी येथे विवाह केला. मात्र, विवाहानंतरही त्याने तरुणीला सासरी नेण्यास टाळाटाळ केली. ४० लाख रुपये, सदनिका आणि मोटार खरेदीसाठी पैसे देण्याची मागणी करुन तिला अपमानास्पद वागणूक दिली. पोलीस उपनिरीक्षक राजेश खांडवे तपास करत आहेत.
समाजमाध्यमामध्ये आक्षेपार्ह टिप्पणीमुळे पोलीस शिपाई निलंबित
समाजमाध्यमात आक्षेपार्ह, प्रक्षोभक टिप्पणी करणाऱ्या पोलीस शिपायाला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिले. समाधान गायकवाड असे निलंबित केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. गायकवाड हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. समाजमाध्यमामध्ये एका दैनिकात प्रसारित झालेली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. गायकवाड याने संबंधित बातमीवर समाजमाध्यमातील खात्यातून आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक टिप्पणी केली. ‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या शिस्तप्रिय पोलीस दलातील शिपायाने अशा प्रकारची टिप्पणी केली. हिंसाचारासा प्रोत्साहन देणे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कृत्यांना समर्थन देणारी टिप्पणी नियमांचे उल्लंघन करणारी आहे. अशा प्रकारच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली’, असे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.
