बारामती : आगामी अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे. नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सोई-सुविधा देण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल, अशी माहिती प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्त, नियोजनमंत्री अजित पवार यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 बारामती येथील नवनिर्मित अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन अजित पवार यांनी दूरचित्रसंवादाद्वारे केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, दूरचित्रसंवादाद्वारे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेचे आयुक्त वीरेंद्र सिंह, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे उपस्थित होते. 

बारामती येथे शासनाकडून आरोग्य विषयक सोई-सुविधा वाढविण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,की शासकीय तसेच खासगी आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणामुळे बारामती व परिसरातील नागरिकांचा फायदा होणार आहे. भारतीय आयुर्वेद मानकानुसार बारामती येथे २०२२-२३ मध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालयही उभारण्यात येणार आहे. राज्यातही आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यावर शासन भर देणार आहे.

अमित देशमुख म्हणाले, की करोनाच्या काळात वित्त विभागाने आरोग्यविषयक सोई-सुविधांकरिता निधी कमी पडू दिला नाही. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील  वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व पदांच्या पदभरतीला मान्यता मिळाली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व निवड मंडळामार्फत भरती प्रकिया राबविण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Substantial provision for medical sector in forthcoming budget says ajit pawar zws
First published on: 28-01-2022 at 01:26 IST